नाशिक – ज्या शिडीने वर गेले, ती शिडी सोडायला भाजप तयार झाला असून त्यांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नकोसा झाला आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात वंचितचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ आलेले आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संघासंदर्भात केलेल्या विधानावर आंबेडकर यांनी भाष्य केले. सुरुवातीच्या काळात आम्हांला संघाची गरज होती. आता भाजप सक्षम झाला असून स्वत:चा कार्यभार पक्ष स्वत: सांभाळत आहे, असे विधान नड्डा यांनी केले आहे. या विधानावर ही चांगली गोष्ट असल्याचा टोला आंबेडकर यांनी हाणला. मध्यंतरी आपण सरसंघचालक मोहन भागवत यांना दोन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला भेटले का, तुम्ही भेटायची वेळ मागितली, तेव्हा त्यांनी ती दिली होती का, असे प्रश्न विचारले होते. परंतु, त्याचे उत्तर काही मिळाले नाहीस, असे त्यांनी सूचित केले.
हेही वाचा >>>नाशिक मनपातील कथित भूसंपादन घोटाळा ऐरणीवर; महायुती-मविआचे आरोप-प्रत्यारोप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या शिवसेनेचे राज ठाकरे हे प्रमुख झाल्यास आश्चर्य वाटायला नको. नरेंद्र मोदी आणि भाजपने ठाकरे बंधूंमध्ये इमानदारीची स्पर्धा लावली आहे. मोदी एकिकडे उद्धव ठाकरेंना गरज पडल्यास सर्वतोपरी मदत करणार असे सांगतात. दुसरीकडे राज ठाकरे यांना प्रचारात सहभागी होण्यास भाग पाडतात. या दोन्ही भावांमध्ये आपल्याशी आणि भाजपशी अधिक कोण एकनिष्ठ, हे जोखले जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधू भाजपबरोबर असतील, असा दावा आंबेडकर यांनी केला. मध्यंतरी मुस्लिम समाजातील बुध्दिजिवींनी ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार की नाही, असा प्रश्न विचारला होता. परंतु, ठाकरेंनी त्याचे उत्तर न देता मोदींवर टीका केली. हा सर्व केवळ देखावा असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.