अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही जणांची खाती काढून घेतल्याने संबंधितांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र असले तरी वैद्यकीय शिक्षणमंत्रिपदाची नव्याने जबाबदारी मिळालेले राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे मात्र एकदम खूश आहेत. उलट वैद्यकीय शिक्षण विभागाची धुरा मिळावी म्हणून आपला आधीपासून आग्रह होता. ती मागणी या वेळी पूर्ण झाल्याने वैद्यकीय शिक्षण खात्यात प्रभावीपणे काम करून दाखविणार असल्याचे सांगत त्यांनी पक्षातील सहकाऱ्यास अप्रत्यक्षपणे चिमटे काढले. बुधवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण खात्याची धुरा सांभाळल्यानंतर बैठकांचे सत्र सुरू केल्याचे नमूद केले. आपण डॉक्टर नसलो तरी आरोग्यविषयक शिबिरांद्वारे २५ वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत आहोत. वैद्यकीय शिक्षण हे आपले आवडते खाते आहे. या खात्याचे साडेतीनशे कोटींचे अंदाजपत्रक आहे. उद्योगांचा ‘सीएसआर’ निधी आणि अन्य उपक्रमांतून हे अंदाजपत्रक दोन ते तीन हजार कोटींपर्यंत नेता येईल. जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या खात्याची धुरा आपल्याकडे सोपविण्यात आल्याचे समाधान असून लवकरच त्यातील सकारात्मक बदल सर्वाना पाहावयास मिळतील, असेही त्यांनी सूचित केले. नाशिक येथे शासकीय पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा व इमारत उपलब्ध आहे. त्यासाठीच्या प्रस्तावाला मान्यता मिळवून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया या वर्षीपासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी सांगितले.