अनिकेत साठे

गोदावरीच्या महापुराचा शहरास तडाखा बसला. बाजारपेठा, निवासी भागात मोठे नुकसान झाले. गेल्या ११ वर्षांतील हा तिसरा महापूर. पहिल्या महापुराची चौकशी झाली, तेव्हा सुचविलेल्या अनेक उपायांची आजतागायत अंमलबजावणी झाली नाही. अतिक्रमणात गुरफटलेली गोदावरी मोकळा श्वास घेईल, असे प्रयत्नही झाले नाहीत. पात्रातील अतिक्रमणे तशीच आहेत. फुगवटा निर्माण करणारा बंधाराही कायम आहे. उलट निळ्या पूररेषेतील बांधकामे वाचविण्यासाठी ती रेषाच कमी करण्याची विचित्र मागणी पुढे आली. गोदा पात्रातून किती पाणी प्रवाहित होईल, याचा अंदाज बांधून गंगापूर धरणाचे काम झाले होते. शहरीकरणात गोदावरी पात्राचा इतका संकोच झाला की, तिची पाणी वाहून नेण्याची क्षमता निम्म्याने कमी झाली. परिणामी, धरणातून क्षमतेच्या निम्मा प्रमाणात विसर्ग झाला तरी आता शहरास महापुराला तोंड द्यावे लागते. या वेळी पुन्हा तेच अधोरेखित झाले.

त्र्यंबकेश्वरमध्ये उगम पावणारी गोदावरी गंगापूर धरणमार्गे नाशिक शहरातून पुढे मराठवाडय़ाच्या दिशेने मार्गस्थ होते. साधारणत: १०० किलोमीटरचा हा प्रवास आहे. यात पात्राचा संकोच झाला तो मुख्यत्वे शहर परिसरात. त्याचे भयावह स्वरूप २००८ मधील महापुरात उघड झाले होते. शहरीकरणात लुप्त झालेले नैसर्गिक नाले आणि अतिक्रमणांमुळे गोदावरीची पाणी वाहून नेण्याची क्षमता घटली आहे. शहराच्या वरील भागात गंगापूर धरण आहे. सहा दशकांपूर्वी बांधलेल्या या धरणातून एकाच वेळी नऊ दरवाजांमधून ८१ हजार क्युसेसचा विसर्ग करता येतो. मोठय़ा प्रमाणात पाणी आल्यास अतिरिक्त ४० हजार क्युसेस पाणी सोडण्याची व्यवस्था आहे.

कधीकाळी ६४ हजार क्युसेस पाणी सहजपणे वाहून नेणारे गोदावरीचे पात्र आता २० ते २५ हजार क्युसेसमध्ये पूरस्थिती निर्माण करते. रविवारी गोदा पात्रातून ८२ हजार क्युसेसचा विसर्ग होता. गंगापूर, आळंदी धरणातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविला जात असताना शहरातही संततधार होती. यामुळे पहिल्या महापुरात गोदावरीने गाठलेली पातळी ओलांडत ती १८६० फूटवर पोहोचली. पंचवटी आणि नाशिक शहर यांना जोडणारे पाच पूल पाण्याखाली गेले. काठालगतच्या बाजारपेठा, निवासी भाग पाण्याने वेढला गेला. पहिल्या महापुराचा कोणताही धडा न घेतल्याचा हा परिपाक. पुराचे रूपांतर महापुरात होण्यात अनेक घटकांनी हातभार लावल्याकडे लक्ष वेधत चौकशी समितीने उपायही सुचविले होते; पण नदीपात्र सुरक्षित राखण्यासाठी पूररेषांची आखणी करण्यापलीकडे काही झाले नाही.

नदीपात्रासह काठावरील अतिक्रमणे पुराची तीव्रता वाढविण्यास कारणीभूत ठरतात. रामकुंड ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत महापालिकेने पात्रात १७ घाट सिमेंट काँक्रीटमध्ये बांधले आहेत. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहाला अडथळे आले. अहिल्यादेवी होळकर पुलाखालील जुन्या बंधाऱ्याने मागील भागात फुगवटा निर्माण होतो. तो काढण्याचा विषय अलीकडेच ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समाविष्ट करण्यात आला. कमी उंचीचे पूल, राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील गोदा पार्क, गोदावरी सौंदर्यीकरणासाठी निळ्या रेषेत पालिकेने राबविलेल्या अनेक प्रकल्पांनी नैसर्गिक प्रवाहात अवरोध आणले. त्यात भर घातली ती बांधकाम व्यावसायिकांनी. अर्थात, त्यासदेखील महापालिकेची साथ होती. पूररेषेची आखणी होण्यापूर्वी नैसर्गिक नाले, नदीकाठालगतच्या बांधकामांना परवानगी देताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याची तसदी घेतली जात नव्हती. नंतर अशा बांधकामांना पाटबंधारे विभागाची परवानगी मिळविण्यासाठी दबाव तंत्रांचा अवलंब केला जात असे. खुद्द पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्याचा गौप्यस्फोट केला होता. गोदावरीसह उपनद्यांच्या पूररेषा आखणीमुळे अशा प्रकारांना काहीसा चाप बसला. मात्र, निळ्या पूररेषेत तत्पूर्वी बांधल्या गेलेल्या बांधकामांचा प्रश्न सुटलेला नाही. याच भागातील रहिवाशांना पुराचा अधिक फटका बसतो. त्यावर तोडगा निघाला नसताना राजकीय वर्तुळातून निळी पूररेषा कमी करण्याची अतक्र्य मागणी केली जाते. गोदा पात्रातील सिमेंट काँक्रीटचे बांधकाम हटवावे, म्हणून गोदाप्रेमी समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले; पण त्या दिशेने  पावले उचलली नाहीत.

गोदावरी पात्रासह लगतच्या भागात झालेली अतिक्रमणे, पक्की बांधकामे, जुना बंधारा यामुळे गोदावरी नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. गंगापूर धरणातून २० ते २५ हजार क्युसेस पाणी सोडले तरी पूरस्थिती निर्माण होते. प्रवाहास अडथळे ठरलेले पात्रातील घाट, जुना बंधारे हटविण्याचा उपाय चौकशी समितीने सुचविला होता; पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. पालिकेने बांधलेले कमी उंचीचे पूलही प्रवाहात अडथळे आणतात. नदीपात्राचे खोलीकरण, निळ्या पूररेषेतील बांधकामे हे विषयही रखडलेले आहेत.

– उत्तम निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग