कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ गायक पंडित सत्यशील देशपांडे, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांच्यासह एकूण आठ जणांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कार पुरस्कारासाठी निवड झाली आहे. १० मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने एक वर्षांआड ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार देण्यात येतो.

यंदा पुरस्काराचे १३ वे वर्ष असून लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाटय़, ज्ञान-विज्ञान, क्रिडा-साहस, चित्र-शिल्प या क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येते.

साहससाठी मुंबईत कमला मिलला लागलेल्या आगीतून स्वतच्या जीवाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत अनेकांचे प्राण वाचविणारे पोलीस कर्मचारी सुदर्शन शिंदे आणि सुरक्षारक्षक महेश साबळे यांची तर संगीत विभागात हिंदुस्थानी संगीत परंपरेचे गाढे अभ्यासक, रचनाकार आणि लेखक पंडित सत्यशील देशपांडे, लोकसेवेसाठी जाती-धर्माला चिकटलेले आयुष्य सोडून माणुसकीशी नाते जोडायला शिकवणारे मेळघाट येथील डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, नाटय़-चित्रपटसाठी ज्येष्ठ अभिनेते, चित्रकार, निर्माते-दिग्दर्शक अमोल पालेकर, ज्ञान विभागात बालरोग तज्ज्ञ आणि धन्वंतरी पुरस्काराने डॉ. स्नेहलता देशमुख तर कल्पना, अनुभव आपल्या कलाकृतीतून साकारणारे आंतरराष्ट्रीय चित्रकार सुभाष अवचट यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

२१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.