• गंगापूर, दारणा धरणातून विसर्ग कायम
  • २४ तासांत जिल्ह्य़ात ६५६ मिलिमीटर पावसाची नोंद

सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी जिल्ह्य़ातील पाच तालुक्यांत पावसाची संततधार सुरूच होती. गंगापूर, दारणा धरणातून सोडलेला विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. गोदावरी, दारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.  मागील २४ तासांत जिल्ह्य़ात ६५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे दमदार आगमन झाले असले तरी अद्याप त्याने पूर्ण जिल्हा व्यापलेला नाही. पाच ते सहा तालुक्यांत सुरू असलेल्या संततधारेने धरणांची पाणी पातळी लक्षणीय उंचावली. उर्वरित आठ ते नऊ तालुक्यांत पावसाचे तुरळक स्वरूप आहे. तिसऱ्या दिवशी पर्जन्यमानात फारसा बदल झाला नाही. इगतपुरीमध्ये १४५, पेठ १३६, त्र्यंबकेश्वर ११३, सुरगाणा ९४ आणि नाशिक तालुक्यात ६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित दिंडोरी ३६, निफाड सहा, सिन्नर २४, चांदवड आणि देवळा प्रत्येकी दोन, बागलाण तीन, कळवण १३, नांदगाव पाच, येवला आठ, मालेगावमध्ये एक मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्य़ात आतापर्यंत ६७०८ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण एक हजार मिलिमीटरने कमी आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास ही तफावत भरून निघेल असा अंदाज आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ७५ टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. आदल्या दिवशीपासून सुरू असलेला ९३०२ क्युसेकचा विसर्ग कायम होता. गंगापूरमधून सोडलेले पाणी आणि पावसाचे पात्रात येऊन मिळणारे पाणी यामुळे शहरातून मार्गस्थ होणाऱ्या गोदावरी पात्रात १३८०५ क्युसेकचा विसर्ग आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास पातळीत वाढ होऊ शकते. यामुळे काठावरील रहिवासी, गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दारणामधून १०६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गंगापूर, दारणा धरणातून सोडलेले पाणी पुढे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून मराठवाडय़ाला जाते. या बंधाऱ्यातून २९५९४ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. धरणांमधून सोडलेले पाणी पाहून नगरमधून मागणी होऊ लागली आहे. गोदावरी डावा आणि उजव्या कालव्यामार्फत पुराचे पाणी राहता, शिर्डी भागास देण्यात येते. तथापि, हंगामात प्रथमच हे पाणी सोडले गेले आहे. हंगामाला अडीच महिन्यांचा कालावधी बाकी असल्याने कालव्यांमधून पाणी सोडण्यासाठी प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

धरणातील जलसाठा

गंगापूर धरणात ४४२२ दशलक्ष घनफूट अर्थात ७९ टक्के साठा आहे.  काश्यपी धरणात ९१९ (५०), गौतमी गोदावरी ७९० (४२), आळंदी ५७७ (५९), पालखेड २३४ (३६), करंजवण २१५८ (४०), वाघाड ८७७ (३५), ओझरखेड ४४७ (२१), पुणेगाव २२४ (३६), तीसगाव १२ (तीन), दारणा ५६१४ (७९), भावली १२७८ (८९), मुकणे २०३५ (२८), वालदेवी ५०० (४४), कडवा ९७५ (५८), नांदूरमध्यमेश्वर ४४ (१७), भोजापूर २७ (सात), चणकापूर १२१६ (५०), हरणबारी २६३ (२३), केळझर ८३ (१५), पुनद ६४८ (५०) असा जलसाठा झाला आहे.