वाडय़ाचा काही भाग कोसळला

जिल्ह्य़ातील पावसाचा जोर काहिसा कमी झाला असून २४ तासात ४८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दारणा, भावली धरणातून एकूण १४ हजारहून अधिकचा विसर्ग कायम आहे. गंगापूरमधील विसर्गाचे प्रमाण निम्म्याहून अधिकने कमी झाले. यामुळे गोदावरीतील पाणी पातळी कमी झाली. नांदूरमध्यमेश्वरमधून गोदापात्रात ५० हजार क्युसेसचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे पावसात जुन्या नाशिकमध्ये जुनाट वाडय़ाचा काही भाग कोसळला. धोकादायक वाडा रहिवाशांनी आधीच रिकामा केला असल्याने  कोणतीही जिवितहानी झाली नाही. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या भागात संततधार सुरू असून सिन्नर, दिंडोरी वगळता इतरत्र तो रिमझिम स्वरुपात आहे. त्र्यंबकमधील पावसाचा जोर ओसरल्याने गंगापूरमधील काही धरणांमधील विसर्ग कमी करण्यात आला. या धरणातून ३१६८ तर आळंदीतून ६८७ क्युसेसचा विसर्ग सुरू आहे. सलग तीन दिवस दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीची पातळी त्यामुळे कमी झाली. इगतपुरी तालुक्यातील धरणांमधील विसर्ग कायम आहे. दारणामधून १३ हजार ५८, तर भावलीतून ७०१ क्युसेस पाणी सोडण्यात आले. या भागातील इतरही काही धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, पावसामुळे शहरात जुने वाडे, घरे कोसळण्याचे सत्र कायम आहे. बुधवारी जुन्या नाशिकमधील तिवंधा चौकालगतच्या अरुंद गल्लीत जुना वाडय़ाचा काही भाग कोसळला. जीर्ण झालेल्या वाडय़ाची पडझड सुरू होती. यामुळे रहिवाशांनी इतरत्र स्थलांतर केले होते. घरातील साहित्य आधीच काढल्याने या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.