घाऊक बाजारात आजवरचा सर्वाधिक भाव

तुर्कस्तानातील कांदा देशात दाखल झाला असला तरी स्थानिक घाऊक बाजारात भाव मात्र दिवसागणिक वाढत आहेत. सोमवारी जिल्ह्य़ातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या कमाल दराने दीड ते दोन हजारांनी उसळी घेत १० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला.

सटाणा बाजारात उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटलला सरासरी नऊ हजार तर नव्या कांद्याला साडेपाच हजार रुपये दर मिळाले. पिंपळगाव बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी साडेनऊ हजार, तर नव्या कांद्याला साडेसात हजार दर आणि लासलगाव बाजारात लाल कांद्याला साडेसहा हजाराचा भाव मिळाला. घाऊक बाजारात आजवर कांद्याला मिळालेला हा सर्वाधिक भाव आहे.

अवेळी झालेल्या पावसामुळे काढणीवर आलेल्या कांद्याचे प्रचंड नुकसान झाले होते. परिणामी, त्याची फारशी आवक नाही. चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा संपुष्टात आला आहे. ही स्थिती दर उंचावण्यास कारक ठरली. सोमवारी त्यात पुन्हा लक्षणीय वाढ झाली. सटाणा बाजार समितीत दीड हजार क्विंटलची आवक झाली. उन्हाळ कांद्यास सरासरी नऊ हजार, तर लाल कांद्याला साडेपाच हजार रुपये भाव मिळाला. वणी उपबाजारात उन्हाळ कांद्याला कमाल १२ हजार तर किमान साडेपाच, सरासरी ८७५० रुपये दर मिळाले. नव्या कांद्याला ५८५० रुपये दर मिळाले. लासलगाव बाजारात दोन दिवसांत भाव दीड हजाराने वाढले. शनिवारी लाल कांद्याला पाच हजार रुपये भाव मिळाला होता. सोमवारी ते साडेसहा हजारावर पोहोचले. या दिवशी चार हजार ७४ क्विंटलची आवक होती. दरवर्षी या काळात नव्या कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक होत असते. एकटय़ा या बाजारात दररोज २० ते २५ हजार क्विंटलची आवक असते. सध्या ती ७५ ते ८० टक्क्य़ांनी कमी होऊन तीन-चार हजार क्विंटलवर आली आहे.

लेट खरीपचा कांदा येण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी आहे. त्या कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर परिस्थितीत बदल होतील, असे या क्षेत्रातील जाणकारांना वाटते. चांगला भाव मिळत असल्याने ज्यांच्याकडे कांदा आहे, त्या उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.