मातृ-पितृ पूजन उपक्रमाला प्रोत्साहन देण्याची मागणी

जागतिक प्रेम दिन ही पाश्चात्त्यांची प्रथा असल्याचे सांगून त्यास विरोध दर्शवून या दिवशी शाळा -महाविद्यालयात मातृ-पितृ दिन पूजन उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. प्रेमाच्या नावाखाली मांडली गेलेली विकृत संकल्पना, त्यामुळे होणारे गैरप्रकार याकडे समितीने लक्ष वेधले आहे.

जागतिक प्रेम दिनी अर्थात १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांची विशेष पथके नेमावीत. शाळा-महाविद्यालयात अपप्रकार करणाऱ्यांना जेरबंद करावेत, वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. प्रेम दिनाच्या पाश्र्वभूमीवर, प्राचार्याची बैठक घेऊन निर्देश द्यावेत, शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखी निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण असल्याचे सांगत काही वर्षांपूर्वी जागतिक प्रेम दिनाला शिवसेनेसह हिंदुत्ववादी भाजपशी संलग्न ‘अभाविप’कडून विरोध केला जात असे. परंतु या दिवसाचे तरुणाईवर असे गारूड आहे की, राजकीय, संघटनात्मक विरोध झुगारून त्यांच्यामार्फत हा दिवस साजरा केला जातो. कालांतराने राजकीय विरोध मावळला.

प्रेम दिवस साजरा करण्याला अधिक उधाण आले. राजकीय पक्षांचा विरोध संपुष्टात आला असताना देशात, राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार स्थानापन्न झाल्यावर हिंदू जनजागृती समितीने या मुद्दय़ावर अधिक भर दिला आहे. प्रेम दिवसाला विरोध करत त्याऐवजी मातृ-पितृ पूजन दिन म्हणून तो साजरा करण्याला प्रोत्साहन देण्याचे साकडे घातले आहे.