शिंदे गावातील २३ घरे जमीनदोस्त; दगडफेक, धक्काबुक्कीचा प्रयत्न

नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणास अडथळा ठरत असलेले शिंदे गावातील २३ घरांचे अतिक्रमण काढण्यास सोमवारी सकाळपासून पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. अतिक्रमणधारकांनी या मोहिमेला विरोध केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. या वेळी जेसीबीवर दगडफेक व अधिकाऱ्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न झाला. नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणास शिंदे गावातील नागरिकांनी आपली जागा देण्यास विरोध केला आहे.

नाशिक-पुणे रस्ता रुंदीकरण दोन वर्षांपासून शिंदे गावातील नागरिकांच्या विरोधामुळे रखडले आहे. रुंदीकरणासाठी स्थानिक नागरिकांना विस्थापित करण्याऐवजी शेजारील जागेचा वापर करावा या मागणीसाठी स्थानिकांनी न्यायालयात धाव घेतली. जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले. मात्र स्थानिकांना यश आले नाही. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांना जागा रिकामी करून द्यावी असे आदेश दिल्याने जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी तसे सूचित केले. काही दिवसांपूर्वी भूसंपादन विभागाने रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या २३ लहान-मोठय़ा घर मालकांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र, या रहिवाशांनी काही दिवस मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार वेळ वाढवूनही स्थानिकांनी अतिक्रमण काढले नाही. दरम्यान, न्यायालयाचा निकाल आणि दिलेला कालावधी संपुष्टात आल्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईस सुरुवात झाली. या वेळी काही ग्रामस्थांनी विरोध करत आठ दिवसांचा कालावधी देण्याची मागणी केली. या वेळी पथकाने न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर विरोध मावळला.

कारवाई सुरू असतांना नाशिकरोड ते सिन्नर मार्गावर दोन्ही बाजूकडे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे प्रवाशांसह, नोकरदार, विद्यार्थी अडकून पडले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, मोहन ठाकूर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह १४ अधिकारी, १४० पोलीस कर्मचारी, शीघ्र कृतिदल असा बंदोबस्त तैनात करण्यात आला. लहान-मोठय़ा स्वरुपाचे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाल्यानंतर स्थानिकांमध्ये अस्वस्थता पसरली. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

बोराडे कुटुंबीयांचा असाही वाद.

शिंदे गावात रस्त्यालगत डॉ. बोराडे यांचे तीन मजली हॉस्पिटल होते. हॉस्पिटल हलविण्याबाबत त्यांना प्रशासनाने तीन आठवडय़ांपूर्वी सूचना केली होती. रुग्ण आणि हॉस्पिटलशी संबंधित काही साहित्य त्यांनी अन्यत्र हलविले असले तरी कुटुंबीय मात्र तेथेच वास्तव्यास होते. अतिक्रमण पथकातील अधिकारी व कर्मचारी ज्या वेळी हातोडा चालविण्यास आले, तेव्हा बोराडे कुटुंबातील काही सदस्यांनी जेसीबीवर दगडफेक केली तर काहींनी पथकातील अधिकाऱ्यांना धक्का बुक्की, मारहाण करण्याचा प्रयत्न केला. वाद चिघळत असल्याचे पाहून नंतर हे कुटुंब साहित्य हलविण्यासाठी अर्धा तासाची वेळ मागत त्या कामात मग्न झाले.