खासगी रुग्णालयांना रेमडेसिविर, प्राणवायुच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाकडून त्याचा मुबलक पुरवठा होत नसून दोन दिवस अतिशय कठीण आहेत. ही स्थिती कायम राहिल्यास, आवश्यक ती साधने वेळेत पुरविली गेली नाही तर आठ दिवसात रुग्णालय, डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करणे अवघड होणार असल्याचा इशारा नाशिक रुग्णालय मालक संघटनेने दिला आहे. प्रशासनाकडून एका खासगी रुग्णालयाला दिली गेलेली रेमडेसिविर संबंधित रुग्णालयास मिळाली नाही. शासनातील एका मंत्र्याने ती परस्पर मालेगावला नेली. या इंजेक्शनची सर्वत्र गरज आहे. खासगी रुग्णालयांची निकड भागविण्याकडे प्रशासकीय यंत्रणांनी लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली.

जिल्ह्याात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय, खासगी आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण वाढत आहे. मागील काही दिवसात व्हेंटिलेटर, प्राणवायुयुक्त खाटा मिळणे अवघड झाले आहे. करोनावर उपचारासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या औषध, साधनांचा तुटवडा भासत असल्याकडे खासगी रुग्णालय संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. राज नगरकर, डॉ. ज्ञानेश्वर थोरात आदी पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. करोनाच्या पहिल्या लाटेत अशी स्थिती उद््भवली नव्हती. पण दुसऱ्या लाटेत आवश्यक ती औषधे, वैद्यकीय साधनांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेऊन त्या प्रमाणात रेमडेसिविर, प्राणवायू उपलब्ध होणे आवश्यक आहे. पुरेसा साठा उपलब्ध झाल्यास काळा बाजारातील विक्रीला चाप बसेल. प्राणवायूची वेगळी स्थिती नाही. शासकीय, महापालिका रुग्णालयांना प्राणवायू मिळतो. पण खासगी रुग्णालयांना आवश्यकतेनुसार प्राणवायू मिळत नसल्याचा सूर यावेळी व्यक्त झाला.

व्हेंटिलेटर, प्राणवायू, रेमडेसिविरसाठी रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो, तेव्हा हतबल होऊन त्यांना नाही म्हणावे लागते. रुग्णालयांत पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी काम करण्यास तयार आहे. पण साधने नसतील तर काम करू शकणार नाही. आजचा, उद्याचा दिवस रुग्णालयांसाठी कठीण आहे. परिस्थितीत बदल झाले नाही तर काम करू न शकणे अशी परिस्थिती ओढावू शकते, असे डॉ. थोरात यांनी म्हटले आहे.

बदनामी थांबवा

करोनावरील उपचारावरील खर्चाबाबत प्रशासनाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. तरीही रुग्णाचे नातेवाईक देयकांवरून अरेरावी करतात. समाज माध्यमांवर रुग्णालयांची बदनामी केली जात आहे. देयकांबाबत कुणालाही शंका असतील तर रितसर तक्रार करू शकतात. त्या तक्रारीला रुग्णालये कायदेशीर उत्तरे देतील. परंतु, समाज माध्यमांवरील बदनामी थांबवावी, अशी मागणी रुग्णालय संघटनेकडून करण्यात आली.