भारतीय नृत्याच्या माध्यमातून संस्काराचा परिचय

नाशिक :  येथील विश्व शैक्षणिक-सांस्कृतिक केंद्र तसेच भारत-युरोप मंडळाचे सदस्य आणि शिवालय नृत्यकला मंदिराच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय युवा प्रकल्पात यशस्वी सहभाग नोंदविला. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संध्या उपक्रमात स्थानिक कलावंतांनी अभिजात भारतीय नृत्याच्या माध्यमातून भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्काराच्या मूल्यांचा अनोखा परिचय करून दिला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा एकात्मता टिकवण्यासाठी युरोपियन महासंघ सातत्याने संमेलन, परिषद, कार्यशाळांचे आयोजन करीत असते. करोनाकाळात ऑनलाइन प्रकल्प राबविले जात आहेत. त्यात विविध विषयांचे शिक्षण झालेल्या, भाषा व कला कौशल्य असलेल्या अभ्यासू विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यात युरोप खंडातील फ्रान्स, पोलंड, आफ्रिकेतील टय़ुनिशिआ, मोरक्को, आयवरी कोस्ट, आशियाभरातील युवक-युवतींची निवड करण्यात आली. यात भारताचे प्रतिनिधित्व येथील विश्व शैक्षणिक-सांस्कृतिक केंद्राचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दीपक मगरे यांच्या नेतृत्वाखाली श्वेता मगरे-पांडे, सरिता कारोळे-आंग्रे, ऐश्वर्या पवार आणि संदीप पांडे यांनी केले.

फ्रान्स, पोलंड, टय़ुनिशिया, मोरक्को आणि येथील प्रतिष्ठित संस्था, नाशिकचे भारत-युरोप मंडळ, विश्व शैक्षणिक-सांस्कृतिक केंद्राच्या सहभागातून हा प्रकल्प राबविला गेला. त्यात आंतरराष्ट्रीय नागरिकता आणि सहजीवन, करोना महामारीचे आव्हान, शाश्वत विकासाचे ध्येय, आंतरराष्ट्रीय एकात्मता व युवा सहभाग, आंतरसांस्कृतिक मूल्यांचे महत्व आदी विषयांचा समावेश होता. नाशिकच्या विद्यार्थ्यांनी वाक् चातुर्याने चांगलीच छाप पाडली. एप्रिल आणि मे महिन्याच्या प्रत्येक शनिवारी तसेच जूनच्या प्रथम व द्वितीय रविवारी विशेष चर्चासत्र आणि कार्यशाळांचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले. अखेरच्या दिवशी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संध्या उपक्रमाने या उपक्रमाचा समारोप झाला. भारताच्या वतीने श्वेता मगरे-पांडे यांनी भरतनाटय़म्, सरिता कारोळे-आंग्रे यांनी उपशास्त्रीय तर ऐश्वर्या पवार यांनी कथक नृत्याचे विलोभनीय दर्शन घडविले.

भारतीय नृत्यातील अंग-प्रत्यंग यांच्या साहाय्याने केलेले शुद्ध नृत्य, मुखाभिनय, नयनाभिनय, सात्त्विकाभिनय याने आंतरराष्ट्रीय समीक्षक अचंबित झाले. फ्रान्सच्या आमसेद इंटरनॅशनलच्या मादाम माथिल्ड ज्युंग, मादाम लिडिया क्लिशु, पोलंडच्या ईएसडी संस्थेचे प्रा. डॉ. पॉवेल टॅम्पझिक, टय़ुनिशियाच्या आवेक इंटरनॅशनलचे प्रा. राशीद जानेन, मोरक्कोच्या चिल्ड्रन अ‍ॅण्ड युथ ट्रस्टच्या प्रा. नादीन बेन्ज, नाशिकच्या संस्थेचे प्रा. दीपक मगरे यांनी सहा देशातील प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. दृक्श्राव्य पद्धतीने झालेल्या आंतरराष्ट्रीय युवा प्रकल्पात सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेले नाशिकचे कलावंत.