सिन्नर शहरातही आठ ते दहा दिवसांआड पाणी

दारणा नदीपात्रातील पाणी कमी झाल्याचा फटका सिन्नर औद्योगिक वसाहतीतील ८०० उद्योगांना बसला असून एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून दररोज टँकरद्वारे पाणी नेण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे माळेगावमधील अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. एमआयडीसीच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे संकट ओढावल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. तर दारणा पात्रातच पाणी नसल्याने ते उचलण्यास अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे एमआयडीसीने म्हटले आहे. औद्योगिक वसाहतीप्रमाणे सिन्नर शहरातही आठ ते दहा दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिक त्रस्तावले आहेत.

पावसाचे आगमन होत नसल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नरमध्ये टंचाईच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्याची झळ मागील दहा दिवसांपासून छोटय़ा-मोठय़ा उद्योगांसह शहरातील नागरिकांना बसत आहे. आठ ते दहा दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे अवघड बनले आहे. टंचाईचे हे संकट लक्षात घेऊन टँकर चालकांनी सर्वसामान्यांची लुबाडणूक करण्याचे धोरण अवलंबले आहे. या संकटामुळे माळेगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष अरुण चव्हाणके, अतिरिक्त चिटणीस आशीष नहार यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यतील काही धरणांमध्ये आजही जलसाठा आहे. परंतु पाण्याचे योग्य नियोजन एमआयडीसीला करता न आल्याने ही स्थिती ओढावल्याची सिन्नरमधील उद्योजकांची तक्रार आहे. सिन्नर-माळेगाव औद्योगिक वसाहतीत गेल्या १५ दिवसांत नळाद्वारे पाणीपुरवठा झालेला नाही. परंतु सध्या उद्योगांना १०० टक्के पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. या औद्योगिक वसाहतीत खाद्यपदार्थ, डेअरी, फार्मा असे उद्योग असून नाशवंत पदार्थ पाण्याअभावी खराब होऊन कोटय़वधींचे नुकसान होत आहे.

एमआयडीसीने उद्योगांना केवळ पिण्याचे पाणी पुरविले जाईल असे आश्वासन दिले होते. हे पाणी उद्योजकांना स्वत:चे टँकर आणून जलशुद्धीकरण प्रकल्पातून भरून घ्यावे लागते. असे असूनही पाणी दिले जात नाही. उद्योजकांना स्वत:चे टँकर पाठवून तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे. पाण्याच्या टँकरची मागणी वाढल्याने टँकरचालकांनी अवाजवी दर आकारणी सुरू केल्याने उद्योजकांमध्ये संतापाची भावना आहे. एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक उद्योगांना खासगी स्वरूपात पाणी मागवावे लागते. या पाण्यासाठी वाजवीपेक्षा अधिक दर द्यावे लागतात. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाही काढण्यात आला. एमआयडीसीने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास रास्तारोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

गुरुत्वाकर्षण बलाने पाणी देण्यास अडचणी

उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठीच देण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश आहेत. दारणा नदीपात्रात चेहेडी येथून एमआयडीसी पाणी उचलते. या ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. तसेच जलशुद्धीकरण केंद्रातून गुरुत्व बलावर उद्योगांना पाणीपुरवठा करता येत नाही. त्यामुळे या केंद्राच्या ठिकाणी संबंधितांना दररोज दोन एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले जाते. टँकरद्वारे उद्योजक हे पाणी घेऊन जातात. समाधानकारक पाऊस होईपर्यंत या स्थितीत सुधारणा होणे अवघड आहे.

– पी. आर. बंडूप्रिया (कार्यकारी अभियंता, एमआयडीसी)