अपार मेहनतीच्या जोरावर खेळाडूंच्या गुणवत्तेला पैलू; नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या देवगावच्या त्रिमूर्ती
मैदानी खेळांसाठी आवश्यक गुणवत्ता जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात अधिक असली तरी या गुणवत्तेला पैलू पाडण्याचे बहुतांशकाम नाशिक शहरातच केले जाते. त्यामुळेच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली धावपटू ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत असो, वडनेर भैरवची संजीवनी जाधव, पिंपळगाव केतकीची मोनिका आथरे, गणेशगावची अंजना ठमके असो, या सर्वाचा ‘धावपटू’ म्हणून खऱ्या अर्थाने परिचय नाशिकमध्ये आल्यावरच सर्वाना झाला. परंतु नाशिकमध्ये न येताही ग्रामीण भागातच सराव करून घेत राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील पायका तसेच शालेय स्पर्धामध्ये आपल्या खेळाडूंकडून पदक मिळविण्याची किमया निफाड तालुक्यातील देवगाव येथील डी. आर. भोसले विद्यालयाच्या एका शिक्षकाने करून दाखवली आहे.
ठरावीक चौकटीतच काम करण्याची बहुतेक शिक्षकांची भावना असते. ही चौकट मोडण्याचा प्रयत्न केल्यास सहकारी शिक्षकांकडून किंवा काही वेळा वरिष्ठांकडूनही विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत असल्याचा अनुभव येत असल्याने अनेक जण चौकटीतच बंदिस्त असतात. महाविद्यालयीन जीवनात कबड्डी आणि मैदानी खेळात रममाण होणारे रावसाहेब वामन जाधव हे मात्र वेगळा विचार करणारे. २००६ मध्ये पुण्याजवळील बालेवाडी येथे राज्यस्तरीय मैदानी खेळांच्या स्पर्धाप्रसंगी काही ज्येष्ठ क्रीडा शिक्षकांच्या गप्पा रंगल्या होत्या. एका शिक्षकाने आपला विद्यार्थी या स्पर्धेत प्रावीण्य मिळवेल, असे सांगताच इतरांनी त्यास प्रबोधिनीतील व शहरी भागातील मुलांपुढे आपली मुले टिकाव धरत नाहीत. ते नेहमी सरावात मागे राहतात. आपली मुले सराव करीत नाहीत, असे लक्षात आणून देत गप्प केले. त्या वेळी जाधव यांनी आपणही विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यावा, अशी सूचना केली. तेव्हा एकाने करून बघा, इतरही भरपूर कामे असतात, असे चिडविले. तेव्हाच जाधव यांनी करून दाखविण्याचा निश्चय केला. दररोज सकाळी ७.३० ते १० ही वेळ विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्यासाठी आपण देत जाऊ, असे त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितले. मुख्याध्यापकांनीही शिक्षक-पालक मेळाव्यात त्याप्रमाणे जाहीर केले.
जाधव यांनी विद्यालयातील उंच व धडधाकट मुले शोधण्यास सुरुवात केली. काही मुलांनी आपणास आवड नसल्याचे, तर काहींनी सकाळी येण्यास जमणार नसल्याचे कळ्विले. त्यातही काही विद्यार्थी निवडून उपलब्ध साहित्यानुसार उंच उडी आणि धावणे (चार बाय ११ मीटर रिले) शिकविण्यास सुरुवात केली. उंच उडीसाठी तेव्हा सातवीत असलेला सर्वेश कुशारे योग्य वाटला. त्यानेही मन लावून सराव केल्याने १६ वर्षांआतील क्रीडा प्राधिकरणाच्या पायका तसेच शालेय गटात १.६० मीटर उंच उडी मारत विभागीय पातळीपर्यंत त्याने अव्वल स्थान मिळविले. दरम्यान, मुखेड आणि देवगाव अशा दोन ठिकाणच्या बदल्यांमुळे जाधव यांचेही सरावाकडे काहीसे दुर्लक्ष झाले. सर्वेश आता दहावीत आला होता. त्यास पुन्हा चालना देण्याची गरज होती. मुख्याध्यापक एस. टी. केल्हे यांनी सर्वतोपरी मदत करण्याची इच्छा दर्शवली. जाधव यांनी सर्वेशचे वडील दिनेश कुशारे यांच्या साथीने मग मक्याचा भुसा, गवत भरलेली उंच गादी तयार केली. उंच उडी मारताना दुखापतीची शक्यता त्यामुळे दूर झाली. सरावानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांत सर्वेश १.३५ मीटर उंचीवरून उडी मारू लागला. पंधरवडय़ातच त्याची झेप १.६२ मीटरवर गेली. २०१०-११ मध्ये त्याने राज्य पातळीवर दोन रौप्य, कांस्य पदक मिळविले. २०११-१२ मध्ये सातारा येथीर राज्यस्तरीय स्पर्धेत १.९५ मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक मिळविले. त्यापुढील वर्षांत जालना येथे पुन्हा सुवर्णाला गवसणी घातली. अश्विनी गायकवाड या विद्यार्थिनीनेही जालन्यातील स्पर्धेत रौप्य पदक मिळविले. उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वेशने रौप्य पदक मिळविण्याची किमया केली. सर्वेश सध्या सांगली येथील राज्य शासनाच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात सराव करत असून २:१० मीटपर्यंत त्याची उडी जात असल्याचे जाधव यांनी नमूद केले.
रावसाहेब जाधव यांच्यासाठी २०१५-१६ हे वर्ष विशेष महत्त्वपूर्ण ठरले. या वर्षांत त्यांच्या तीन शिष्यांनी पदकांची कमाई केली. निकिता संभेरावने २०१५ मध्ये १४ ते २५ वर्षे वयोगटात उस्मानाबाद येथील पायका स्पर्धेत सुवर्ण, याच गटात जम्मूमध्ये झालेल्या स्पर्धेत रौप्य, सांगली येथे आयोजित १६ वर्षांआतील गटात सुवर्ण, याच गटात आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्ण, १७ वर्षांआतील गटात राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत सुवर्ण, याच गटात केरळमधील शालेय स्पर्धेत रौप्य अशी पदकांची माळच निकिताने लावली. याच शाळेच्या साक्षी मेमाणेने १४ वर्षांआतील गटात सांगलीच्या शालेय स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्याने केरळमधील शालेय स्पर्धेतही ती सहभागी झाली.
चार बाय १०० मीटर रिले शर्यतीत १६ व १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने कांस्य पदक मिळविले आहे. प्रियंका दरेकरने १६ वर्षांआतील गटात सांगली येथील स्पर्धेत १०० मीटर धावण्यात रौप्य मिळविले. डिसेंबर २०१५ मध्ये आंध्र प्रदेशात झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या रिले संघाची ती सदस्य होती.
अशा प्रकारे अनेक असुविधांवर मात करत देवगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या भोसले विद्यालयाच्या या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य, कांस्य अशा एकूण १६ पदकांची कमाई आतापर्यंत केली आहे.
संस्थेचे क्रीडा संचालक हेमंत पाटील आणि शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोचरे यांच्याकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळेच इथपर्यंत मजल मारता आल्याचे जाधव हे नमूद करतात. निकिता आणि प्रियंका या दहावीची परीक्षा देत असून साक्षी इयत्ता आठवीत आहे. या खेळाडूंनी यापुढेही नियमितपणे सराव केल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना पुढे आणण्याच्या निश्चयाने दररोजच्या तासिका सांभाळून विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ देणारे जाधव यांच्यासारख्या शिक्षकांचा आदर्श इतरांनीही घेणे गरजेचे आहे.