मुख्य सूत्रधारास अटक, पाच जण फरार

नाशिक : सिडकोतील उंटवाडी येथे मुत्थूट वित्तीय संस्थेत गोळीबार करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न करतांना एका कर्मचाऱ्याचा खून करणाऱ्या आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. टोळीच्या मूख्य सूत्रधारास गुजरातमधून अटक करण्यात आली असून उर्वरित पाच संशयित अद्याप फरार आहेत.  या टोळीचा जळगावच्या रावेरस्थित बँकेवरील दरोडय़ाच्या प्रयत्नाशी काही संबंध आहे का? याचीही तपासणी करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती सोमवारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुत्थूट फायनान्सच्या कार्यालयात १४ जून रोजी टोळक्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. गोळीबारात अभियंता संजू सॅम्युअल यांचा मृत्यू, तर व्यवस्थापक आणि कर्मचारी असे दोघे जखमी झाले होते. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे ठाकले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने वेगवेगळ्या राज्यांमध्ये पथक पाठवत दहा दिवसांत क्लिष्ट, गुंतागुंतीच्या प्रक्रिया पार पाडून या आंतरराज्य टोळीचा छडा लावला.

गुन्ह्य़ात वापरलेल्या तीन पल्सर दुचाकी पेठ रस्त्यावरील आशेवाडीजवळ मिळाल्या होत्या. त्यांच्यावरील क्रमांक बनावट होते. चेसिज क्रमांकाची इतकी खाडाखोड करण्यात आली होती की, ते व्यवस्थित दिसत नव्हते. अखेर बजाज कंपनी आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून पल्सरबाबत माहिती मागविण्यात आली. त्याआधारे गुजरातमध्ये एका पल्सरच्या मूळ मालकाचा शोध लागला. संबंधिताच्या मुलाने ती पल्सर मित्राला दिली होती.

त्याआधारे सुरत येथून गुन्ह्य़ाचा मुख्य सूत्रधार जितेंद्र विजय बहादूरसिंग राजपूत (३४, मूळ बैसान, जोहानपूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून टोळीतील सर्व साथीदारांची नावे मिळाली.

यामध्ये उत्तर प्रदेशातील आकाशसिंह राजपूत, परमिंदर सिंग, पश्चिम बंगाल येथील पप्पू ऊर्फ अनुज साहु आणि मूळचा उत्तरप्रदेशचा सुभाष गौड यांचा समावेश आहे.

टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

टोळीतील काही गुन्हेगारांची कारागृहात ओळख झाली होती. मुख्य संशयित जितेंद्र राजपूतने फेब्रुवारी २०१९ मध्ये सराईत गुन्हेगारांना रामगड येथे बोलावून मुत्थूट फायनान्सवर दरोडय़ाचा कट रचला. संशयित सुभाष गौड हा २०१६ पासून श्रमिकनगर भागात रहात होता. तो बनकर सिक्युरिटी संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. संशयितांनी पाच ते सहा वेळा मुत्थूट फायनान्सची पाहणी केली होती. गौडनेच दरोडय़ासाठी आलेल्या संशयितांची राहण्याची व्यवस्था केली. गुन्ह्य़ात वापरलेली एक पल्सर गौडच्या मालकीची असल्याचे उघड झाले. संशयित पप्पू उर्फ अनुज साहू याच्यावर पश्चिम बंगालमध्ये दरोडा, दंगल आदी गंभीर गुन्हे आहेत. त्याने नाशिकमध्ये त्याच्या बहिणीकडे आश्रय घेतला होता. गुन्ह्य़ात सहभागी सर्व संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल असून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक (मोक्का) कारवाई केली जाणार आहे.

‘तृणमूल’कार्यकर्त्यांकडून पोलिसांना विरोध

या प्रकरणातील पप्पू ऊर्फ अनुज साहू हा संशयित मूळचा पश्चिम बंगाल येथील आहे. त्याला पकडण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक पश्चिम बंगालमध्ये धडकले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याच्या घरी छापा टाकला गेला. परंतु, तत्पूर्वीच तो निसटला होता. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधास पोलिसांना तोंड द्यावे लागले. संशयित पप्पू त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा नाही, याची स्पष्टता झालेली नाही. परंतु, त्याच्या बचावार्थ तृणमूलचे कार्यकर्ते पुढे आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.