राष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धा

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी पंचवटीतील क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत विभागाच्या वतीने शुक्रवारपासून आयईटी ‘कर्मवीर एक्स्पो’ या राष्ट्रीय पातळीवरील वैज्ञानिक प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धेस सुरुवात झाली.

महाविद्यालयाच्या आवारात टी.डी.के. इप्कॉस प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास आय अ‍ॅण्ड सी चे विभागीय व्यवस्थापक अनंत वाघचौरे उपस्थित होते. कर्मवीर एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिकल वाहने, माहिती तंत्रज्ञान, कृषी, यंत्र-अवजारे आदी गटांमध्ये देशभरातील १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कर्नाटक, गुजरातसह  महाराष्ट्रातून ८० विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. परीक्षेचा काळ असल्याने अन्य काही स्पर्धक प्रदर्शनात टप्प्याटप्प्याने सहभागी होणार आहेत. परीक्षक म्हणून ओ. जी. कुलकर्णी, धीरज मेथीकर, रवींद्र वाडीकर, गणेश उशीर, दिनेश शिरसाठ उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी पारितोषिक वितरणाने प्रदर्शनाचा समारोप होईल.

परीक्षक कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करून आव्हानांचा स्वीकार करावा, असा यशाचा मूलमंत्र दिला. प्रदर्शनात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा संशोधन आविष्कार उपस्थितांनी अनुभवला. पुलवामा हल्ला असो किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये वेळी-अवेळी होणारे हल्ले देशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत विद्यार्थ्यांनी ‘बुमर’ हे अनोखे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या यंत्राव्दारे सीसीटीव्ही, जीपीएस, तापमान, अंतर आदींची माहिती देण्यात येते. हे यंत्र आठ किलो वजनाचे असून रोबोप्रमाणे ते भ्रमणध्वनी अ‍ॅपच्या माध्यमातून शत्रुपक्षाच्या हालचालींवर लक्ष ठेवत तेथे पोहचण्यासाठी असणारे अंतर, वातावरण, मार्गातील अडथळे याची माहिती देणार आहे.

शनिवारी दिवसभर प्रदर्शन नाशिककरांसाठी खुले आहे. नाशिककर आणि विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन क. का. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

विविध तंत्रविष्कार

वाहन चोरीचे वाढते प्रकार पाहता क. का. वाघच्या विद्यार्थ्यांनी अनोखे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. दुचाकीच्या स्टार्ट बटनजवळील यंत्रावरील बोटांचे ठसे आपल्या भ्रमणध्वनीवरील अ‍ॅपवरील ठशांशी जुळल्याशिवाय दुचाकी सुरू होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सौरऊर्जा आणि सांडपाण्याचा वापर करत वीज निर्मिती तसेच ‘स्मार्ट बिल्डिंग’प्रतिकृतीने अनेकांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांचे भुईमुग, कांदा अन्य बी-बियाणांच्या लागवडीत जाणारा वेळ, येणारा खर्च कमी करण्यासाठी केवळ अ‍ॅपच्या माध्यमातून हे काम कसे करता येईल, यासाठी विशेष यंत्र तयार करण्यात आले आहे. जे शेतकऱ्यांचा वेळ तसेच खर्च वाचवणार आहे.