जिल्ह्य़ात दुष्काळाचे सावट गडद होत असताना आणि ग्रामीण भागात पाण्यासाठी सर्वसामान्यांची भटकंती सुरू असतानाच बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे सुरू असणाऱ्या जैन धर्मीयांच्या ऋषभदेव महामस्तकाभिषेकात गुरुवारी शेकडो लिटर दूध, काही टन दही व शुद्ध तुपाचा समावेश असलेल्या पंचामृताचा १०८ फुटी मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. मांगीतुंगीच्या डोंगरात भगवान ऋषभदेव यांची अखंड पाषाणात साकारलेली ही जगातील सर्वाधिक उंचीची मूर्ती असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे. या मूर्तीच्या भव्यतेला साजेशा पद्धतीने महामस्तकाभिषेक सोहळ्यास सुरुवात झाली. या ठिकाणी भ्रमंती केल्यास दुष्काळी सावटाचा कुठे लवलेशही जाणवत नसल्याचे दिसून येते.
बागलाण तालुक्यातील जैन धर्मीयांचे पवित्र श्रीक्षेत्र मांगीतुंगी येथील पर्वतावर भगवान ॠषभदेव यांच्या १०८ पूर्णाकृती मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक सोहळ्यास मागील आठवडय़ात दिमाखदारपणे सुरुवात झाली होती. ध्वजारोहण, नित्यपूजन, याग मंडल व नवग्रह होम, गर्भकल्याण, सर्वतोभद्र महल महाराणी मरुदेवी द्वारा स्वप्नदर्शन, जन्मकल्याणक, ऐरावत शोभायात्रा, जन्माभिषेक, भिक्षा कल्याण, केवलज्ञान कल्याणक आदी धार्मिक कार्यक्रम झाल्यावर गुरुवारी ११ वाजता महामस्तकाभिषेकास सुरुवात झाली. या वेळी कमल जैन, वीरेंद्र हेगडे, जैन, पन्नालाल कासलीवाल यांच्यासह महोत्सव संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. डोंगरावर साकारलेल्या भव्य मूर्तीच्या अभिषेकासाठी संयोजकांनी जय्यत तयारी केली. मूर्तीच्या पाठीमागील बाजूने मस्तकाभिषेकासाठी खास व्यवस्था केली गेली. मंत्रोपचारात पंचामृताद्वारे या सोहळा पार पडला. त्यासाठी शेकडो लिटर दूध, काही टन दही, शुद्ध तूप, केसर व पाणी यांचा वापर केल्याचे सांगण्यात येते. ६ मार्चपर्यंत महामस्तकाभिषेक सुरू राहणार असून प्रत्येक राज्यातील भाविकांना त्याचा मान देण्यात आला आहे.

या सोहळ्यानिमित्त मांगीतुंगी नगरीचे स्वरूप संयोजकांनी पालटले आहे. एक लाख चौरस फूट आकाराचा भव्य सभामंडप उभारण्यात आला. इतकेच नव्हे तर, परिसरात स्वागत कमानी, पथदीप, आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या वास्तव्यासाठी अडीचशे एकर भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपाची निवासस्थाने उभारण्यात आली. छोटेखानी गाव तयार करत या ठिकाणी पर्यावरणपूरक ‘उडन टेंट’ तसेच प्रत्येक घरात स्वच्छता गृह, प्रसाधनगृह यासह प्रथमोपचार, मदत केंद्र, मोफत भोजन व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सोहळ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. संयोजकांनी सोहळ्याचे नियोजन अशा पद्धतीने केले की, परिसरात दुष्काळाचे कुठेही अस्तित्व दिसत नाही. या सोहळ्यासाठी जलसंपदा विभागाने खास लगतच्या धरणातून पाण्याची व्यवस्था केली आहे.