25 February 2021

News Flash

‘भाषा संगम’चे नियोजन, पण शाळा आणि शिक्षणाधिकारीच अनभिज्ञ

केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भाषांची गोडी लावण्याचे शिक्षण विभागासमोर आव्हान

शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये विविधतेत एकता, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश रुजावा यासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाअंतर्गत ‘भाषा संगम’ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यस्तरावर या उपक्रमास प्रतिसाद लाभत असल्याचा दावा शिक्षण विभाग करीत असला तरी नाशिकमध्ये या उपक्रमाविषयी शिक्षणाधिकारी, शाळा अनभिज्ञ असल्याचे उघड झाले आहे. दुसरीकडे, विशिष्ट माध्यमांसाठी पालकांच्या अट्टहासात विद्यार्थ्यांना भाषांची गोडी लावायची कशी, हे शिक्षण विभागासमोर आव्हान आहे.

केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी यासाठी एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अनुषंगाने २० नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत राज्यातील सर्व आस्थापनांच्या, माध्यमांच्या शाळांमध्ये ‘भाषा संगम’ हा कार्यक्रम राबविण्याची सूचना केंद्र स्तरावरून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्व भारतीय भाषांबद्दल प्रेम आणि आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. मराठी, गुजराथी, हिंदी, बंगाली, पंजाबी, आसामी, उर्दू, तामिळसह अन्य २२ भाषांमध्ये सामान्यत़ बोलली जाणारी पाच साधी वाक्ये परिपाठामध्ये विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यायची आहेत.

सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची उपलब्धता तसेच मराठी माध्यमांमध्ये शिक्षकांचा असणारा वावर पाहता शिक्षण विभागाकडून यासाठी आवश्यक असलेली माहितीपुस्तिका संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या पुस्तिकेच्या आधारे महिनाभराचे वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांकडून परिपाठाच्या दिवशी त्या त्या भाषेची १० वाक्ये म्हणून घेणे यात अपेक्षित आहे. यासाठी काही भाषा तज्ञ, ग्रामस्थांचे सहकार्य घ्यावे लागणार आहे.

नाशिक जिल्ह्य़ात अद्याप शाळांशी या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. शिक्षकांनाही भाषा संगम कार्यक्रमात काय अपेक्षित आहे, याविषयी काही उजळणी वर्ग किंवा प्रशिक्षण दिले गेलेले नाही. स्पष्टता नसल्याने शाळांकडून ‘अजून एका नव्या उपक्रमाची भर’ अशी त्रासिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

महापालिका शिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी भाषा संगम असा काही कार्यक्रम सुरू असल्याचे ऐकिवात नसल्याचे सांगितले. विद्या प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र नियोजन अंतिम टप्प्यात असून दिवाळीच्या सुटीमुळे सरकारी शाळांशी संपर्क होऊ शकला नाही. या संदर्भात लवकरच पत्रव्यवहार होईल, असे नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 1:21 am

Web Title: language sangams planning but unaware of the school and education officer
Next Stories
1 मुंढेंच्या बदलीच्या आनंदोत्सवाचे ‘रामायण’
2 लघू-मध्यम उद्योजकांच्या विकासासाठी शिबिरांची मात्रा
3 मुंढेंच्या बदलीनंतरचा आनंदोत्सव महागात, अज्ञातांवर गुन्हा दाखल
Just Now!
X