करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १० किलो लिटर आणि नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयात २१ किलो लिटर क्षमतेची प्राणवायूची टाकी बसविण्यात आली होती. दीड महिन्यापूर्वी डॉ. हुसेन रुग्णालयात ती कार्यान्वित झाली. नव्याने बसविलेल्या टाकीतील तांत्रिक दोषाने २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. प्राणवायूच्या अशा व्यवस्थेच्या तपासणीची निकड समोर आली आहे. या व्यवस्थेची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची होती, असे महापालिकेचे म्हणणे आहे.

द्रवरूप प्राणवायूची तातडीने उपलब्धता करण्यासाठी महापालिकेने नवीन टाकी खरेदी करून बसविण्याची चाचपणी केली होती. परंतु, त्यास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने तातडीची गरज म्हणून घाईघाईत पुण्यातील एका कंपनीकडून १० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दोन्ही रुग्णालयांसाठी उपरोक्त टाक्या घेण्यात आल्या. प्राणवायूच्या सुविधेसाठी अशा पद्धतीने राज्यातील कुठल्याही शासकीय रुग्णालय किं वा महापालिकेत काम झाले नसल्याचे पालिकेचे म्हणणे होते. १० किलो लिटर क्षमतेच्या टाकीसाठी वार्षिक चार लाख २४ हजार तर, २१ किलो लिटर क्षमतेच्या टाकीसाठी सहा लाख ३७ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. प्राणवायू पुरवठ्याची जबाबदारी त्याच कंपनीवर टाकण्यात आली. १५ रुपये क्युबिक मीटर दराने पुनर्भरणासाठी वार्षिक दोन कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. प्राणवायूची मागणी कमी झाल्यास हा खर्च कमी-जास्त होईल असे गृहीत धरले गेले. दोन, तीन वेळा निविदा मागवूनही पुण्यातील एकाच ठेकेदाराची निविदा आली.

तातडीचे कारण देऊन हे काम संबंधित संस्थेला देण्यात आले. कार्यान्वित झालेल्या यंत्रणेची महापालिकेने तपासणी केली की नाही, हा प्रश्न आहे. यासंदर्भात पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी करारानुसार टाक्यांची देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीची असल्याचे नमूद केले.