दिंडोरीतील लखमापूर येथील घटना

ग्रामीण भागात बिबटय़ाची दहशत वाढतच असून सोमवारी दुपारी दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरात बिबटय़ाच्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला गंभीर जखमी झाली. जिल्हा शासकीय रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत.

दिंडोरीच्या परमोरी, लखमापूर परिसरात बिबटय़ांच्या हल्ल्यात दीड ते दोन वर्षांत तीन बालकांना जीव गमवावा लागला आहे. बिबटय़ाच्या संचाराने परिसर भयग्रस्त असताना वन विभाग त्यांना जेरबंद करण्यासाठी पावले उचलत नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लखमापूरच्या हनुमानवाडी शिवारात सोमवारी दुपारी मंगला बाळासाहेब दळवी-देशमुख या शेतात काम करत होत्या. यावेळी शेजारील उसाच्या शेतातून आलेल्या बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला चढविला. बिबटय़ाने त्यांची मानगुटीच पकडली. अकस्मात झालेल्या घटनेमुळे दळवी यांना उभे राहणे किंवा पळणे शक्य झाले नाही. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासच्या शेतातील काही जणांनी धाव घेतल्यावर बिबटय़ा पसार झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. हल्ला इतका तीव्र होता की, दळवी यांच्या मानेतून मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाला. ग्रामस्थ, कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काही वर्षांत दिंडोरीच्या कादवा काठावरील परिसरात बिबटय़ाच्या हल्ल्याचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. दोन वर्षांत तीन लहान बालकांना बिबटय़ाच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले. काही महिन्यांपूर्वी याच परिसरात कुटुंबीय घरात भोजन करत असताना बिबटय़ाने मांजरीला पळवून नेले होते.

बिबटय़ांचा कायमचा बंदोबस्त करावा

कादवा नदीकाठालगत उसाचे मोठे क्षेत्र आहे. हा संपूर्ण बागायती परिसर असून बिबटय़ांच्या अधिवासासाठी पोषक आहे. हल्ल्याची एखादी घटना घडली की, वन विभाग तात्पुरत्या स्वरूपात पिंजरा लावण्याची कार्यवाही करते. अनेकदा बिबटय़ा पिंजऱ्यात अडकतही नाही. काही दिवसांनी ही घटना विस्मृतीत जाते. नवीन घटना घडली, की पुन्हा तोच कित्ता गिरवला जातो, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. परिसरातील शेकडो विद्यार्थी छोटय़ा-मोठय़ा रस्त्यांवरून शाळा, तत्सम कामांसाठी ये-जा करत असतात. परिसरात आधीच भीतीचे वातावरण असताना हल्ल्याच्या घटनेमुळे त्यात आणखी भर पडली आहे. वन विभागाने बिबटय़ांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.