प्रशासनाकडून नियोजन अंतिम टप्प्यात

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सात दिवसांचा कालावधी शिल्लक असतांना जिल्हा प्रशासनाकडून निकालाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठीचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. अंबड येथील वेअर हाऊसमध्ये नाशिक आणि दिंडोरीसाठी मतमोजणी होणार आहे. पोलीस बंदोबस्तासह मतमोजणीसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

मतदानानंतर अंबडच्या वेअर हाऊस गोदामात नाशिक, दिंडोरी मतदारसंघातील मतपेटय़ा ठेवण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ आणि अपक्ष माणिक कोकाटे यांनी सुरक्षाव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह उभे केले होते. प्रशासनाने आरोप फेटाळत तेथील सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचे सांगितले. मंगळवारी आनंदकर यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

पोलीस आणि  राज्य राखीव दलाच्या जवानांचा बंदोबस्तात समावेश असून परिसरात ठिकठिकाणी ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी २३ मे रोजी उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवार घालण्यासाठी वेअर हाऊसकडे येणारे रस्ते ठराविक अंतरावर बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ ओळखपत्र असणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. वेअर हाऊसमध्ये विधानसभा मतदार संघनिहाय टेबल मांडण्यात येणार असून एका केंद्रासाठी सात टेबल असतील. दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकारी यांना वेअर हाऊस परिसरातील स्ट्राँग रुममध्ये प्रवेश देण्यात येईल. त्यांच्यासमोर मतपेटय़ांचे सील तोडण्यात येईल आणि पावणेआठनंतर मतमोजणीला सुरुवात होईल, असे आनंदकर यांनी सांगितले. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ८४ टेबल लावण्यात येणार असून नाशिकसाठी २७, तर दिंडोरीसाठी मतमोजणीच्या २५ फेऱ्या होणार आहेत. एका फेरीसाठी ४५ मिनिटांचा कालावधी अपेक्षित असून सहाही विधानसभा मतदारसंघांची एकाच वेळी मतमोजणी केली जाईल. एक फेरी पूर्ण झाल्यावर सहाही विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी हाती आल्यावर निवडणूक अधिकारी फेरीनिहाय मतांची आकडेवारी जाहीर करतील. सर्व फेऱ्यांचा विचार केल्यास मतमोजणीस १४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या सर्व फेऱ्या झाल्यानंतर प्रत्येक विधानसभानिहाय पाच मतदान केंद्रावरील व्हीव्ही पॅटच्या चिठ्ठय़ा मोजल्या जातील. त्यासाठी किमान पाच तासांचा कालावधी लागणार असल्याने निकाल रात्री उशिरा हाती येईल. मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यास २४ तासांचा कालावधी गृहीत धरण्यात येत असून प्रशासन त्या अनुषंगाने तयारी करत आहे. टपालाद्वारे आलेल्या मतदानाची स्वतंत्र मोजणी होणार आहे. तसेच, मतमोजणीच्या पूर्वदिनी तयारीचा आढावा घेण्यासाठी मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.  दरम्यान, मंगळवारी मतमोजणी केंद्राला आनंदकर यांच्या समवेत जिल्ह्य़ातील माध्यम प्रतिनिधींनी भेट दिली. या वेळी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.

क्यूआर कोडसाठी ३० यंत्रे

जिल्ह्यातील  सात हजार ५०० जवानांना ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या. प्रत्येक मतपत्रिकेला क्यूआर कोड देण्यात आला आहे. मतमोजणीच्या दिवशी प्राप्त झालेल्या मतपत्रिकांच्या झेरॉक्स काढल्या जाणार आहेत. क्यूआर कोड यंत्राच्या साहाय्याने मतपत्रिका तपासल्या जातील. त्यासाठी ३० क्यूआर कोड यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येक मतपत्रिकेला कोड देण्यात आल्याने बनावट मतपत्रिकांच्या आक्षेपाला कोठेही थारा नसेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.