महापुराचा तडाखा बसल्यानंतर पाच दिवस उलटून गेले तरी गोदा काठाजवळील बाजारपेठेत चिखल आणि गाळ साचला असल्यामुळे व्यवसाय अद्याप सुरळीत झालेले नाहीत. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे या महापुरात कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. नुकसान कसे भरून निघणार, या विवंचनेत व्यावसायिक आहेत. काहींनी तोटा सहन करत शिल्लक मालाच्या विक्रीचा मार्ग अवलंबला आहे.

गोदावरीचा महापूर दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. इतके नुकसान होऊनही प्रशासकीय पातळीवर दखल घेतली गेली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. सोमवारी पूर ओसरल्यानंतर परिसरात साफसफाईला सुरुवात झाली होती. बरेचसे सामान दुकानात असताना पुराची पातळी वाढली. यामुळे फर्निचर काढता न आल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. लाकडाचे फर्निचर खराब झाले असून ते पुन्हा नव्याने करण्याशिवाय गत्यंतर नाही.

बहुतांश दुकानातील वस्तू वाहून गेल्या. भांडी बाजारातील दुकानांमधून भांडी मोठय़ा प्रमाणात वाहून गेली. जी भांडी दुकानात राहिली, ती चिखलाने भरली. त्यात भांडय़ासह पितळ्याच्या शोभेच्या वस्तूंचाही समावेश आहे. व्यापाऱ्यांनी या वस्तूंची साफसफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. दुकानांतील वीजव्यवस्था पूर्ण निकामी झाल्याने ती बदलावी लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही पुराचा फटका बसला. भांडी बाजारात प्रदीप तापकिरे यांचे दुकान आहे. पुरामुळे झालेले नुकसान भरून निघणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. दुकानात सर्वत्र गाळ साचला असून अद्याप साफसफाई सुरूच आहे. प्रशासनाने पुराच्या स्पष्ट सूचना दिल्या असत्या, तर हे नुकसान टळले असते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भांडी बाजारात कोटय़वधींचे नुकसान झाले. चेतन कासार या दुकानदाराने पूरस्थितीतून बाजारपेठ अद्याप सावरली नसल्याचे सांगितले. काठालगतची लहान दुकाने अद्याप बंदच असून गाळात फसलेली आहेत. त्यामुळे जेसीबीव्दारे गाळात फसलेली दुकाने काढण्याचा दुकानदारांचा प्रयत्न आहे. लहान व्यापाऱ्यांना हे नुकसान परवडणार नाही. प्रशासनाने केवळ पंचनामे न करता प्रत्यक्ष मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा अंबिका प्लास्टिकच्या शीतल वाटपकर यांनी व्यक्त केली.

धोकादायक रामसेतूवर विक्रेत्यांची गर्दी

महापुराच्या तडाख्यात बाजारपेठेलगतचा सर्वात जुना म्हणून ओळखला जाणाऱ्या रामसेतूला पुलाला मधोमध तडा गेला आहे. या भेगेतून पुलाखालून वाहणारे पाणी दिसत आहे. पुलाची स्थिती नाजूक आहे.  पुलावरून वाहतूक नसते. पण, या ठिकाणी दुतर्फा भाजी, फळ विक्रेत्यांसह अन्य काही जणांनी पाणी ओसरल्यावर व्यवसाय थाटला आहे. यामुळे त्यांना धोका संभवतो.  या संदर्भात महापौर रंजना भानसी यांच्याकडे विचारणा केली असता या संदर्भात पालिका आयुक्तांशी चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.