इगतपुरी येथील पंचायत समिती सभापती, आदिवासी लोकप्रतिनिधी गोपाळ लहांगे यांच्यावर हेतुपुरस्सर सरकारी यंत्रणेकडून कारवाई होत असल्याचा आरोप करत संबंधित भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी- कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागणी मान्य न झाल्यास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला.
लहांगे हे आदिवासी लोकप्रतिनिधी असून इगतपुरी येथील पंचायत समितीत सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. सभापती म्हणून काम करताना त्यांनी जिल्हा परिषद शाळा, आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत अशा विविध ठिकाणी कायम भेटी देत तेथील कामे सुरळीत रहावे असे प्रयत्न केले.
लहांगे यांच्या कार्यशैलीमुळे शासकीय कामात होणारी आर्थिक चिरीमिरी बंद पडल्याचा दावा संघटनेने केला. आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या गैरकारभाराविषयी सर्वत्र चर्चा असताना माता- बाल मृत्यू प्रमाण, सर्पदंश, साथरोग यावर प्रभावीपणे काम करता आलेले नाही. संबंधितांकडून महिला कर्मचाऱ्यांचे विविध माध्यमांतून शोषण होत आहे.
कार्यशाळा नावाखाली बनावट बिले सादर करत गैरव्यवहार केले जातात. तालुक्यात जाती, जमाती, इतर दुर्बल घटकांतील मुलींची बनावट संख्या दाखवून मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार करून त्यांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवले जाते. तसेच, पंचायत समिती कार्यालयात १५ ग्रामसेवक यांना कार्यभार न देता विनाकारण बसऊन जनतेची हेळसांड केली जात असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात केला आहे. विविध शासकीय विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे लहांगे यांनी बाहेर काढत त्याविरुद्ध आवाज उठविला. त्याच द्वेषापोटी सरकारी यंत्रणेने त्यांच्यावर खोटे आरोप करत कारवाई केल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या पाश्र्वभूमीवर, संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करावे, लहांगे यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.