*   शासकीय रुग्णालयांना २० ‘कृत्रिम श्वसन यंत्रणा’ *   करोनाविरोधातील लढाईत आरोग्य विद्यापीठाची रसद

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील निवासी डॉक्टर, शिक्षक आणि विद्यार्थी सर्वत्र मैदानात उतरून प्रत्यक्ष आरोग्य सेवा देत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी विद्यापीठाने तब्बल ३५ हजार संरक्षण पोशाख (पीपीई किट) उपलब्ध केले आहेत. शासकीय महाविद्यालयांना २० ‘व्हेंटिलेटर’ देण्यात येत आहेत. करोना रुग्णालय, काळजी केंद्रात शिक्षक-विद्यार्थी थेट बाधितांच्या संपर्कात येतात. त्यांच्यासाठी सुरक्षाकवच योजना सुरू केली आहे.

करोना संकटात आरोग्य विद्यापीठाचे काम दिसत नसल्याचा उल्लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील आढावा बैठकीत केल्यानंतर विद्यापीठाने चार-पाच महिन्यांत केलेल्या कामांची मोठी यादीच पवार यांच्यासह आरोग्यमंत्र्यांना सादर केली आहे. बहुतांश महाविद्यालये स्थानिक प्रशासनाने करोना संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी ताब्यात घेतली. पुण्यासोबत राज्यात सर्वत्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर, विद्यार्थी, परिचारिका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी करोना रुग्णालये आणि काळजी केंद्रात काम करीत आहेत. होमिओपॅथी महाविद्यालयांनी औषधाचे मोफत वितरण केले. आयुर्वेद महाविद्यालयांनी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद काढा तर युनानी महाविद्यालयांनी युनानी काढय़ासाठी औषधे वितरित केली. विद्यापीठाच्या संलग्नित सर्व महाविद्यालयांत करोना केंद्र स्थापन करून रुग्णसेवा केली जात आहे. करोनावरील संशोधन, प्रशिक्षण, जनजागृतीवर अव्याहतपणे काम सुरू आहे. करोना रुग्णालये आणि काळजी केंद्रात मोठय़ा संख्येने शिक्षक, विद्यार्थी कार्यरत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सुमारे सात हजार तर आंतरवासीयता करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नऊ हजार इतकी आहे. या सर्वाच्या संरक्षणासाठी ३५ हजार संरक्षक पोशाखांचे (पीपीई किट) प्रयोजन  करण्यात आले. ज्या महाविद्यालयाकडून मागणी येईल तिथे तात्काळ पुरवठा केला जाईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.

राज्यात अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरची कमतरता जाणवते. त्यामुळे आरोग्य विद्यापीठ शासकीय रुग्णालयांना २० व्हेंटिलेटर देत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांना ती दिल्यामुळे शिक्षणासह करोना रुग्णांवर उपचार असा त्याचा दुहेरी उपयोग होईल. शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राधिकरण सदस्य यांच्यासाठी करोना १९ सुरक्षा कवच योजना सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या उपचारासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत तर दुदैवाने मृत्यू झाल्यास तीन लाखांची मदत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मनुष्यबळाच्या कमतरतेवर उपाय

करोना काळात निमवैद्यकीय (पॅरामेडिकल) कर्मचाऱ्यांचा सर्वत्र तुटवडा भासत आहे. व्हेंटिलेटर परिचारिका किंवा डॉक्टरांना सुरू करावे लागते. ईसीजीचे कामही त्यांनाच करावे लागते. यावर तोडगा काढण्यासाठी आपण मुंबईतील डॉक्टरांशी चर्चा करून रेडिओलॉजीच्या नवीन सात ते आठ शिक्षणक्रमांची रचना केली. त्यासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयाची मदत झाली. शासनमान्यतेनंतर १ ऑक्टोबरपासून विद्यापीठ हे शिक्षणक्रम सुरू करत आहे. याद्वारे संपूर्ण राज्यात कुशल तंत्रज्ञ उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार आहे.

– डॉ. दिलीप म्हैसेकर (कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ)