विद्यार्थी आणि प्रवाशांना मनस्ताप 

नाशिक : शहर परिसरातील मुख्य बस थांब्यांवर रिक्षाचालकांनी अतिक्रमण केल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहर वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटसक्तीसह अन्य मोहिमा राबविल्या जात असताना बेशिस्त रिक्षाचालकांना मात्र मोकळीक दिली आहे काय, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

महापालिका आणि राज्य परिवहनच्या शीतयुद्धात विद्यार्थ्यांसह प्रवासी भरडले जात असताना याचा फायदा रिक्षाचालक उचलत आहेत. बस फेऱ्या कमी झाल्याने आगाराचा नियोजित बस थांबा हे रिक्षाचालकांसाठी हक्काचे रिक्षा स्थानक झाल्याचे चित्र शहर परिसरात पाहायला मिळते. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरासमोर रस्त्याचे काम सुरू असल्याने सीबीएस चौफुली परिसरात रिक्षाचालकांनी शालिमार, मेळा बस स्थानकासमोरील रस्ता व्यापला आहे. या ठिकाणी रिक्षा थांबा असला तरी चालकांकडून मनमानी पद्धतीने रिक्षा उभ्या करून इतर वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण केला जातो. तीच परिस्थिती रविवार कारंजा येथे आहे.

बस स्थानक परिसर रिक्षांच्या गर्दीत हरवला असून प्रवासी आणि विद्यार्थ्यांना दुकानासमोर, रस्त्याच्या मध्यभागी येऊन बसची वाट पाहावी लागते. शाळा सुरू होताना तसेच भरताना अडचणी येतात. गर्दी आणि रिक्षा यामुळे नियोजित थांब्यावर बस थांबत नसून पुढे किंवा आधीच थांबून प्रवाशांची चढ-उतार होते. शालिमार परिसरात देवी मंदिर तसेच आयएमए हॉलसमोरील मुख्य रस्त्यावर हे चित्र कायम दिसते. सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिक रोड या ठिकाणी रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला सामोरे जावे लागत आहे. एरवी दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती तर चारचाकी वाहनचालकांना सीटबेल्टसाठी आग्रही असणारे वाहतूक पोलीस रिक्षाचालकांबद्दल नरमाईचे धोरण का स्वीकारतात, याचे कोडे नाशिककरांना पडले आहे. रिक्षाचालकांचे बस थांब्यावरील अतिक्रमण आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास, याकडे पोलिसांचे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.