News Flash

नगरपालिका निवडणुकीला गालबोट

हाणामारीच्या या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मनमाडमध्ये दोन उमेदवारांमध्ये हाणामार

मनमाड नगरपालिका निवडणुकीची प्रचार मोहीम अंतिम टप्प्यात असतानाच बुधवारी सकाळी दोन उमेदवारांमध्ये मागील कुरापतींवरून वाद होऊन जोरदार हाणामारीची घटना घडली. त्यात मनमाडचे माजी नगराध्यक्ष व सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार योगेश ऊर्फ बबलू दिलीप पाटील आणि त्यांचे सहकारी गणेश निंबाळकर तसेच याच निवडणुकीत सध्या प्रभाग दोनमधून अपक्ष निवडणूक लढवीत असलेले माजी नगरसेवक रफिक शेख असे तीन जण जखमी झाले. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून शहर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यातील तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून दोघा जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हाणामारीच्या या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली, तर पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत उपाययोजना केली. मंगळवारी रात्री येथील इंदिरानगर भागातील रहिवासी देशमुख परिवारातील एका वयोवृद्ध महिलेचे निधन झाले. म्हणून माजी नगरसेवक रफिक शेख हे देशमुख यांच्या निवासस्थानी सांत्वनासाठी गेले होते. त्या वेळी मागील वादाची कुरापत काढून शेख व पाटील समर्थकांत वाद झाला. पोलिसांनी या घटनेप्रकरणी रफिक शेख यांच्या फिर्यादीवरून तक्रार नोंदवून घेतली. शेख व पाटील यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून चर्चा करत समजूत काढली, परंतु बुधवारी सकाळी पुन्हा या वादाची ठिणगी पडली. अंत्ययात्रेदरम्यान या दोघांमध्ये स्मशानभूमीतच वाद झाला आणि अंत्यविधीनंतर स्मशानभूमी रस्त्यावरच रफिक शेख व योगेश पाटील यांच्यात हाणामारी झाली. त्यात योगेश ऊर्फ बबलू पाटील व गणेश निंबाळकर हे जबर जखमी झाले. जखमींना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पोलिसांनी तातडीने दोघांचे जाबजबाब नोंदवून घेतले. मारहाणीच्या आशयाची तक्रार पाटील यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी रफिक शेख, हसन शेख व लतीफ शेख या तिघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. माजी नगरसेवक रफिक शेख यांनी स्वतंत्र तक्रार दिली. त्यात माजी नगराध्यक्ष योगेश पाटील व इतरांनी मागील भांडणाची कुरापत काढत मारहाण करत जखमी केल्याचे म्हटले आहे. मुख्य म्हणजे योगेश पाटील व रफिक शेख हे सध्याच्या २७ व्या पालिका निवडणुकीत वेगवेगळ्या प्रभागांतील नगरसेवकपदासाठीचे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत. दरम्यान, रात्री या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन योग्य ती कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता, अशी नागरिकांची तक्रार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 12:47 am

Web Title: manmad municipal elections
Next Stories
1 कृषिमालाचे व्यवहार जुन्याच नोटांनी
2 ‘सैराट’सह अन्य चित्रपटगीतांच्या चालीवर प्रचार
3 कचराकुंडीपासून नोटाबंदीपर्यंत सारे काही..
Just Now!
X