ग्रामीण भागात जोरदार पावसामुळे जिल्ह्यातीला बहुतांश धरणे तुडूंब भरून ओसंडून वाहत आहे. नदी-नाले व ओढय़ांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले तर शेत जलमय झाल्याचे चित्र आहे. दिंडोरी तालुक्यांत भिंत कोसळून एक महिला ठार झाली तर शाळेची संरक्षक भिंत कोसळून विद्यार्थी जखमी झाला.
दिंडोरी तालुक्यात पालखेड व वाघाड धरण तुडूंब झाले आहे. पुणेगाव धरणातून उनंदा नदीत विसर्ग सुरू आहे. वाघाड परिसरात १४४ मिलीमिटर तर तालुक्यात सरासरी १०० मिलीमिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. वाघाड धरण ओसंडून वहात असून पुणेगाव धरणात ४००० क्युसेस उनंदा नदीत विसर्ग सुरु आहे. पालखेड धरणातून ४४००० क्युसेसचा विसर्ग कादवा नदीत सुरू आहे. नाशिक-कळवण रस्त्यावर रणतळे येथे तसेच शहरात स्टेट बँक परिसर व कोलवन नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. इंदोरे येथे भिंत कोसळून कलावती गांगोडे ही महिला ठार झाली. तर ओझे येथे शाळेची संरक्षक भिंत कोसळून योगेश उघडे हा विद्यार्थी जखमी झाला. सततच्या पावसामुळे शेती-पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दिंडोरी गावात धामण नदीचे तर वणी शहरात देव नदी व नाल्याचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली. ओझर-जानोरी-मोहाडी मार्गावर पुलांवरून पाणी वहात असल्याने हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील चोवीस तासात या तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २१३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कसारा घाटातही पावसाचा जोर असून अशोका व बाहुली धरण परिसरात धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
शेतात पाणी भरल्याने भातासह अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला. त्र्यंबकेश्वर तालुक्यात यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. त्र्यंबकेश्वर गावात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. पावसाचे पाणी घराघरात शिरल्याने मोठे नुकसान झाले. बाहेरगावहून आलेल्या भाविकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे
लागले.
नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरगाणा, कळवण व पेठ तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. देवळा ५९ मिलीमीटर, बागलाण ५२, चांदवड ४३, निफाड ५८, येवला २०, नांदगाव १९ या तालुक्यात त्याचे प्रमाण तुलनेत कमी होते. मालेगाव तालुक्यात मागील चोवीस तासात केवळ तीन मिलीमीटर पाऊस झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. निफाड तालुक्यात सायखेडा-चांदोरीला जोडणारा गोदावरी नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे नाशिक-निफाड तालुक्याचा संपर्क खंडित झाला. सिन्नर तालुक्यात तुरळक प्रमाण असल्याने शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. भोजापूर धरण ओसंडून वाहत असून सरदारवाडी, उंबरदर, कोणांबे, पोरखिंड ही धरणे भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सततच्या पावसामुळे जलयुक्त शिवारात बांधण्यात आलेले बंधारे भरले असून काही बंधारे लवकरच भरतील अशी आशा आहे. येवला व मनमाड येथे केवळ रिमझिम स्वरूपात पाऊस आहे. मात्र याही काळात पावसाने उघडीप घेतली. मनमाड येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्याने शहरातील विंधनविहीरी तसेच विहिरींना पाणी आले आहे. त्यामुळे शहराचा काही दिवसांसाठी पाणी प्रश्न सुटला आहे. मालेगाव येथे संततधार सुरू असून गिरणा नदीला पूर स्थिती निर्माण झाली आहे.