03 December 2020

News Flash

नाशिकमध्ये २५०० व्यापाऱ्यांकडून परवाने परत

शेत व संकलन केंद्रावर माल घेण्याची तयारी; रविवारी लासलगावात बैठक

शेत व संकलन केंद्रावर माल घेण्याची तयारी; रविवारी लासलगावात बैठक

बाजार समितीत कांदा, धान्य, बेदाणा, टोमॅटो व डाळिंबाच्या व्यवहारात आडत देण्यास विरोध करणाऱ्या जिल्ह्यतील सुमारे अडीच हजार व्यापाऱ्यांनी शनिवारी बाजार समित्यांचे परवाने परत करण्याचा पवित्रा घेतल्याने समिती संचालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याद्वारे दबावतंत्र अवलंबताना व्यापाऱ्यांनी शेतातून आणि आपल्या संकलन केंद्रावर माल खरेदीची तयारी केली आहे. समिती बाहेर ही खरेदी झाल्यास फसवणुकीचे प्रकार घडू शकतात. त्या व्यवहारास समितीसारखे संरक्षण राहणार नाही, याकडे बाजार समित्यांनी लक्ष वेधले आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी रविवारी दुपारी जिल्ह्यतील सर्व व्यापारी आणि बाजार समिती सभापतींची लासलगाव येथे बैठक होणार आहे.

कृषिमालाच्या लिलावावर बहिष्कार टाकणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची नोटीस समित्यांनी यापूर्वीच बजावली होती. शासनाने कृषिमाल नियमनमुक्त केला आहे. बाजार समितीत आडत व तत्सम खर्चामुळे खरेदी महाग पडते. नव्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना माल कोठून खरेदी करावा, याचे बंधन राहिलेले नाही. त्यामुळे बाजार समितीचे परवाने परत करण्याचा निर्णय घेतल्याचे व्यापारी संघटनेने म्हटले आहे. त्या अनुषंगाने शनिवारी सायंकाळपर्यंत सुमारे अडीच हजार व्यापाऱ्यांनी आपले परवाने परत केल्याचे संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी सांगितले.

जिल्ह्यत भाजीपाल्याचे लिलाव सुरळीत झाले असले तरी कांदा, टोमॅटो, बेदाणा व धान्याचे लिलाव अद्याप बंदच आहेत. आडत व तत्सम खर्चाचा भार पडल्याने समिती ऐवजी बाहेरील खरेदी स्वस्तात पडणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी उपरोक्त मालाचे व्यवहार समितीबाहेर करण्याचे निश्चित करत तशी तयारी केल्याचे भंडारी यांनी नमूद केले. व्यापाऱ्यांच्या पवित्र्यामुळे बाजार समिती संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. बाजार समितीच्या बाहेर खरेदी झाल्यास फसवणुकीचे प्रकार घडतील. कृषिमालाच्या पैशाला हमी राहणार नसल्याचा मुद्दा घेऊन संचालक शासनाकडे दाद मागणार आहेत. कांद्यासह इतर कृषिमालाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजता जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती आणि व्यापारी यांची संयुक्त बैठक लासलगाव बाजार समितीत होणार आहे.

धुळ्यात किरकोळ विक्रेत्यांकडून आडत घेण्यावरून गोंधळ

आडत मुक्तीचा निर्णय झाल्यानंतर व्यापारी व आडतदारांनी शेतकऱ्यांऐवजी किरकोळ विक्रेत्यांकडून त्याची वसुली सुरू केल्याचे पडसात शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उमटले. आठ ते दहा टक्के आडत देण्यास विरोध करत किरकोळ विक्रेत्यांनी पांच कंदिल, चैनी रस्त्यावरील आपले व्यवहार बंद ठेवले. अखेरीस पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाची विक्री झाली. व्यापारी व आडतदारांच्या भूमिकेमुळे नवीन पेच निर्माण झाला आहे. किरकोळ विक्रेत्यांनी आडत देण्यास विरोध केला. या मुद्यावरून भाजीबाजार बंद ठेवत त्यांनी व्यवहारावर बहिष्कार टाकला. त्यास इतरांनी समर्थन दिले. आसपासच्या भागातून आलेल्या किरकोळ विक्रेत्यांना रोखण्यात आले. काहींचा माल हिसकावण्यात आला तर काहींचा फेकण्यात आला. यामुळे बाजार समितीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली. व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांच्या वादात शेतकऱ्यांची अडवणूक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी बाजार समितीत धाव घेऊन मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सकाळी दहानंतर बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत सुरू झाले. शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाची विक्री होऊ शकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 1:15 am

Web Title: market committees licenses back from nashik vegetable business
Next Stories
1 गोध्रातील संशयिताचे धुळ्यात वास्तव्य
2 धुळे-नाशिक महामार्गाच्या सहापदरीकरणास मान्यता
3 कांदा व्यापाऱ्यांचा परवाने परत करण्याचा निर्णय
Just Now!
X