नाशिक : परप्रांतियांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य परिवहनने सुरू केलेली मोफत बससेवा बुधवारीही सुरू राहिली. पंचवटीतील हॉटेल जत्रापासून परप्रांतियांना बसमध्ये बसविण्यात आले. परंतु, या ठिकाणी सावलीची विशेष व्यवस्था नसल्याने मिळेल त्या ठिकाठी दाटीवाटीने परप्रांतीय आपला नंबर कधी येईल, याची वाट पहात बसल्याचे दिसून आले. त्यामुळे शारीरिक अंतर पथ्याचा फज्जा उडाला. काहींनी मास्कही लावलेले नव्हते.

काही दिवसांपासून परराज्यात जाण्यासाठी नोंदणी करूनही प्रशासकीय परवानगी मिळत नसल्याने अनेकांनी पायपीट करत तर काहींनी सायकल, मिळेल त्या वाहनाने वैध, अवैध मार्गाने आपले इच्छित स्थळ गाठण्यासाठी द्राविडी प्राणायाम स्विकारला. परप्रांतीयाची होणारी फरफट पाहता राज्य शासनाकडून राज्य परिवहनच्या मदतीने रविवार पासून मोफत बस सेवा सुरू करण्यात आली.  नाशिक येथील महामार्ग परिसर तसेच पंचवटीतील हॉटेल जत्रा येथून मध्य प्रदेशच्या दिशेने २३ बस सोडण्यात आल्या. बस फेरीचा ५०६ पेक्षा अधिक प्रवाश्यांनी लाभ घेतला. याशिवाय ठाण्याहूनही नाशिक आगाराच्या १५६ बस सोडण्यात आल्या असून तीन हजार ४३२ प्रवाश्यांनी या सेवेचा लाभ घेतला. प्रशासनाकडून परप्रांतीय, स्थलांतरितांची काळजी घेण्यात येत असतांना संबंधितांकडून सर्व नियम धाब्यावर बसविण्यात येत आहे.

बुधवारी परप्रांतियांचे लोंढे मुंबई-आग्रा महामार्गाने पायपीट करतांना दिसताच त्यांना पोलिसांनी हॉटेल जत्राजवळ थांबविले. राज्य परिवहनला यासंदर्भात माहिती दिली गेली. राज्य परिवहनच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल जत्रा परिसरात धाव घेत थांबलेल्या प्रवाश्यांची आधारकार्डच्या सहाय्याने नोंदणी करण्यास सुरूवात केली. अनेक जण आपल्या चिमुकल्यांसह पायीच निघाले होते. त्यांच्याकडील आवश्यक कागदपत्रांची तपासणी करत सामाजिक संस्थांच्या मदतीने त्यांना अल्पोहार उपलब्ध करून देण्यात आला.

यावेळी प्रवास करण्यासाठी आतुर झालेल्या लोकांनी शासनाने लागु केलेल्या कुठल्याही नियमांचे पालन केले नाही. दाटीवाटीने घोळका करत उन्हापासून बचाव करण्यासाठी सावली मिळेल त्या ठिकाणाचा आधार घेतला. बसमध्ये क्रमांकानुसार चढण्यासाठी रस्त्यावर प्रत्येकाचे सामान ठेवून रांग लावण्यात आली. बसमध्ये त्या क्रमांकानुसार बसविण्यात आल्यावर बस मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना झाली.