14 August 2020

News Flash

राजकीय पक्षांच्या तपासणी शिबिरांमुळे गोंधळ

तपासणीमुळे संबंधित रुग्ण करोना सकारात्मक असल्याच्या गैरसमजातून अनेकांना मनस्ताप

तपासणीमुळे संबंधित रुग्ण करोना सकारात्मक असल्याच्या गैरसमजातून अनेकांना मनस्ताप

नाशिक : महापालिका प्रशासनासह शिवसेना आणि भाजप हे पक्ष करोनाविरूध्दच्या लढाईत मैदानात उतरल्याने महापालिका परिसरात सातपूर वगळता वेगवेगळ्या प्रभागांमध्ये आरोग्य तपासणी, होमिओपॅथी गोळ्यांचे वितरण अशी कामे युध्द पातळीवर हाती घेण्यात आली आहेत. या तपासणींव्दारे मोठय़ा प्रमाणावर रूग्णांचा आकडा उघड होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. वास्तविक, या शिबिरांमधून होणारी तपासणी केवळ प्राथमिक म्हणजे ‘शीघ्र प्रतिजन’ तपासणी आहे. यातून केवळ करोनाच्या प्राथमिक लक्षणांची माहिती मिळते. त्यातून पुढील उपचाराची दिशा कळते. परंतु, या तपासणीमुळे संबंधित रुग्ण करोना सकारात्मक असल्याच्या गैरसमजातून अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महापालिका परिसरातील नगरसेवकांकडून नागरिकांची तापमान तपासणी, प्लस ऑक्सिमीटर चाचणी, होमिओपॅथी गोळ्यांचे वितरण तसेच करोनासदृश्य लक्षणे आढळणाऱ्यांची शीघ्र प्रतिजन तपासणी करण्यात येत आहे. यामुळे शहराला शिबिराचे स्वरूप प्राप्त झाले असून एक हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे. १९३ पेक्षा अधिक रुग्ण करोनाग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, तपासणी शिबिराचा उठाठेव ही राजकीय श्रेयवादातून होत असतांना नागरिकांना मात्र नाहक वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशाच एका शिबिरात तपासणी केलेल्या एका नागरिकास नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

पंडित कॉलनी परिसरात एका नगरसेवकाच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात संबंधित व्यक्ती, पत्नी, आई, बहीण आणि बहिणीची मुलगी यांच्यासोबत तपासणीसाठी गेली. मुलांना हलकासा ताप असल्याने त्यांचा तपासणी अहवाल करोना सकारात्मक आला. हे समजताच त्यांनी तेथेच रडण्यास सुरूवात केली. मुलांना शांत करून एका ठिकाणी बसविण्यात आले. अन्य नातेवाईकांची तपासणी सुरू असतांना मुलांच्या आईचा तपासणी अहवालही सकारात्मक आला. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने तेथे असलेल्या नऊ आणि सात वर्षांच्या मुलांना उचलून करोना उपचार केंद्रात दाखल केले. विशेष म्हणजे याची मुलांच्या नातेवाईकांना माहितीच देण्यात आली नाही. अखेर, मुलगे आणि त्यांची आई तपोवन येथील विलगीकरण कक्षात दाखल असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी कोणीही तपासणी केली नाही. नेमके काय झाले, याची माहिती देण्यात आली नाही. यामुळे धास्तावलेले लहान मुलगे अधिकच रडायला लागले. नगरसेवकांच्या मदतीने त्या मुलांना तेथून काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. आम्ही मुलांचे घरीच विलगीकरण करू, खासगी रुग्णालयात उपचार करू, असे वेगवेगळे पर्याय देऊनही महापालिकेचा आरोग्य विभाग त्यांना सोडण्यास तयार नव्हता.

अखेर बालकांच्या घशातील स्त्रावाची तपासणी केली असता त्यातील एकास करोना असल्याचा अहवाल प्राप्त झाला. परंतु, मुलीला कोणतेही लक्षणे नसल्याने तिला घरीच अलगीकरण करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. या कालावधीत संबंधित व्यक्तीस आलेला अनुभव विचित्र होता. प्रतिजन चाचणी ही केवळ प्राथमिक आहे. तिचा अहवाल कधीही बदलू शकतो. उपचार केंद्रातही परिचारिका किंवा डॉक्टर सहकार्य करत नसल्याने करोनाविषयी असणारी भीती वाढत असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले. सिडको परिसरातही नगरसेवकांकडून तपासणी शिबीर सुरू असून याचा ताण महापालिकेच्या आरोग्य विभागावर येत आहे. अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर नगरसेवक महापालिकेची, एखाद्या सामाजिक संस्थेची मदत घेत शिबिराचे नियोजन करत आहेत. यामुळे मूळ कामावर  विपरीत परिणाम होत आहे. दुसरीकडे, शिबीर तपासणीच्या ठिकाणी होणारी गर्दी, माहितीचा अभाव, शारीरिक अंतर पथ्य नियमांची खुलेआम होणारी पायमल्ली याविषयी कोणीही बोलण्यास तयार नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 2:24 am

Web Title: misunderstanding from corona examin camps of political parties zws 70
Next Stories
1 रुग्णांसह कर्मचाऱ्यांची हेळसांड
2 करोना लढाईत आता पालिका शालेय शिक्षकांची फौज
3 लघू उद्योगाबरोबरच माती परीक्षणाचे धडे
Just Now!
X