नाशिक : सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी-अधिक होत असली तरी करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी मात्र वाढतच आहे. आतापर्यंत या आजारामुळे ४८४ जणांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक २६७ रुग्णांचे मृत्यू नाशिक शहरातील आहेत. तर नाशिक ग्रामीण ११३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८४  आणि जिल्ह्य़ाबाहेरील २० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या साडेतेरा हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. त्यातील १० हजार २८० रुग्ण बरे होऊन घरी परतले. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात अडीच हजार रुग्ण उपचार घेत आहेत. प्रतिजन चाचण्यांद्वारे संशयित रुग्णाची जलद पडताळणी होत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. मंगळवारी शहरात १२२ रुग्ण आढळले होते. पुढील चोवीस तासात ही संख्या ३८१ वर पोहोचली. या दिवशी ११ जणांचा मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत एकूण साडेआठ हजार रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६६०६ जण करोनामुक्त झाले आहेत. मृत्यू झालेल्यांची संख्या २६७ वर गेली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्याही विस्तारत आहे. सध्या शहरात ३९७ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. अहवालानुसार जिल्ह्यतील १० हजार २८० करोनाबाधितांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या दोन हजार ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात सर्वाधिक १५८५ रुग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामीणमध्ये १४९ तर चांदवड ५१, सिन्नर १०१, दिंडोरी ४९, निफाड ११९, देवळा ६९, नांदगांव ६७, येवला २५, त्र्यंबकेश्वर १५, सुरगाणा १६, पेठ तीन, कळवण दोन, बागलाण २४, इगतपुरी ९८, मालेगांव ग्रामीण ३५ असे एकूण ८२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८९ तर जिल्ह्यबाहेरील दोन रुग्णांचा या आकडेवारीत समावेश आहे.