साहसी क्रीडाप्रकारांवरील लघुपटांचा थरार पाहता येणार

नाशिक : गिर्यारोहण आणि गिरिभ्रमणविषयक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या वैनतेय संस्थेच्या वतीने रविवारी दुपारी १२ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात ‘बाम्फ माऊंटन फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नाशिककरांना विविध साहसी क्रीडाप्रकारांवर आधारित लघुपट पाहता येणार आहेत.

यंदा वैनतेयच्या सहकार्याने आयोजित महोत्सवात चारपासून ३९ मिनिटांपर्यंत लांबी असलेल्या विविध साहसी प्रकाराचे ११ लघुपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये लिव्ह अलाँग द वे, फॉर द लव्ह मेरी, धिस माऊंटेन लाईफ-कॉस्ट रेंज ट्रॅव्हर्स सेगमेंट, फार आऊट, सरफेस, ड्रीम राईड थ्री आदींचा समावेश आहे. कॅनडा येथे नोव्हेंबरमध्ये बाम्फमाऊंटन फिल्म फेस्टिव्हल या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यात गिर्यारोहणाबरोबरच अनेक साहसी खेळांचा समावेश असतो. जगभरातून आलेले साहसवीर आणि त्यांचे लघुपट यातून निवडक लघुपट जागतिक पातळीवर ठिकठिकाणी दाखविण्यात येतात. मुंबई येथील हिमालयन क्लब आणि कॅनेडिअन उच्चायुक्त यांच्या सहकार्याने भारतात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. चार वर्षांपासून  वैनतेयच्या वतीने साहसप्रेमींसाठी हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.  महोत्सवात सहभागी होण्यासाठी तसेच याविषयी अधिक माहितीसाठी राहुल सोनवणे (९३७३९००२१९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वैनतेयच्या वतीने करण्यात आले आहे.