कुसुमाग्रज स्मारकामध्ये आजपासून आयोजन

कॅनव्हॉसवर होणारी रंगाची मुक्त उधळण, मातीच्या गोळ्यातून आकारास येणारे शिल्प, टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेतून तयार होणाऱ्या शोभिवंत वस्तू.. अशा विविध कलात्मक चित्र, वस्तू आणि कलाकृतींचे ‘मुक्तरंग’ हे कलाप्रदर्शन १ ते ४ जानेवारी या कालावधीत होणार आहे.

गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात हे प्रदर्शन होईल. भारतीय संस्कृतीत ६४ कलांचा संगम पाहावयास मिळतो. यातील निवडक कला सद्य:स्थितीत आहेत. त्यांचे संवर्धन करण्याच्या हेतूने मुक्तरंगची निर्मिती झाली.

या कला प्रदर्शनात भारतीय शैलीतील चित्रे, रचना चित्रे, आर्टिटेक्चरल, अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग, टेराकोटा पेंटिंग, छायाचित्रे, हस्तकलेचे नमुने एका छताखाली रसिकांना उपलब्ध करण्याची संकल्पना आहे.

प्रदर्शनात मोनल आंबेकर, सोनल जाधव, जयश्री आंबेकर, चंद्रकिशोर जाधव, उद्धव आंबेकर या युवा कलाकारांच्या निवडक कलाकृती ठेवण्यात येणार आहेत.

प्रदर्शनाचे उद्घाटन आ. सीमा हिरे यांच्या हस्ते तर भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, सुरेश पाटील, विद्या फडके आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

स्मारक परिसरात हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीमध्ये सर्व रसिकांसाठी खुले राहणार आहे.

कला रसिकांनी मोठय़ा संख्येने या विविधरंगी कला प्रदर्शनास भेट द्यावी, आणि वेगळ्या कलाप्रकाराचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.