तळेगाव घटनेच्या पाश्र्वभूमीवर महापालिका शिक्षण मंडळाचा उपक्रम

तळेगाव प्रकरणानंतर शहर परिसरात उमटलेले पडसाद पाहता आजही नागरिक दहशतीच्या वातावरणाखाली वावरत आहेत. जातीय तेढ, सर्वधर्म समभाव मूल्यांचा अभाव यासह अन्य समाजविघातक वृत्तींचे संस्कार उमलत्या पिढीवर होऊ नये यासाठी महापालिका शिक्षण मंडळाने पुढाकार घेतला आहे. यासाठी स्वतंत्र चित्रफित तयार करत समाजविघातक कारवाईमुळे कुटूंबाचे तसेच सामाजिक मालमत्तेचे होणारे नुकसान याकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन सातत्याने या माध्यमातून होणार आहे.

मागील तीन ते चार दिवस शहर परिसरात दगडफेक, जाळपोळ असे प्रकार घडले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुजाण नागरिक याकडे तटस्थ भूमिकेतून पाहत असला तरी नकळत्या वयात लहान मुलांवर जातपात, दंगल, जाळपोळ, संचारबंदी यासह अन्य काही शब्दांचा भडीमार होत आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षात कुतुहलपोटी या चर्चेचा आपण भाग व्हावा, याचा प्रतिकार करता यावा ही भावना मुलांच्या मनात डोकावु शकते किंबहुना अशा प्रसंगाची झळ एखाद्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबाला पोहचली तर चिमुकल्याच्या हातात दगड सहज येऊ शकतो. ही शक्यता लक्षात शिक्षण मंडळाने प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांच्या मार्गदर्शनाने अनोख्या उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. चित्रफीतीच्या आधारे दंगल किंवा जाळपोळी सारख्या समाज विघातक कारवायातून कुटूंब व समाजाचे काय नुकसान होते, त्याचे काय परिणाम असतात यावर भाष्य करतांना धर्मगुरूंचा सामाजिक सलोखा व शांततेचा संदेश यातून देण्यात येणार आहे. सार्वजनिक मालमत्तेचे होणारे नुकसान त्याचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवितांना पोलिसांची भूमिका, त्यांना करावे लागणारे प्रयत्न याकडे लक्ष वेधण्यात येईल. साधारणत १० मिनिटांची ही चित्रफित असुन नाशिक पालिकेच्या २८ केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांना ती दाखविण्यात येणार आहे.

या विषयी कार्यशाळेत मार्गदर्शन व प्रबोधन, शिक्षकांचे शंका समाधानाचे सत्र होईल. त्या चित्रफितीची एक ध्वनीमुद्रिका शाळेला सुपूर्द करण्यात येईल. दिवाळीच्या सुटीनंतर वाजणाऱ्या पहिल्या घंटेसोबत मूल्यशिक्षणाच्या तासिकेला ही चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविण्यात येईल. त्यांना त्यातील प्रत्येक मुद्यावर दररोज मार्गदर्शन करण्यात येईल. समाजविघातक कृत्यापासून परावृत्त करत सामाजिक सलोखा व सर्वधर्मसमभाव मुलांमध्ये रुजावा याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.