घरगुती वापराच्या वीजेच्या तारेशी उच्च दाबाच्या तारेचा संपर्क आल्याने घरगुती वापराच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा स्फोट झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे घडली. या स्फोटामध्ये वीज दुरुस्तीचे काम करणा-या दोन कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाले असून जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घोटी शहरातील अष्टविनायक नगर येथे रौफ शेख यांच्या घराच्या दुरुस्तीचे काम चालू होते. हे काम करण्यासाठी घरातील वीज मीटर बाजूला घ्यायचे होते. या कामासाठी त्यांनी कंत्राटी काम करणाऱ्या दोन कामगारांना बोलवले होते. काम सुरु असताना घराच्या वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या तारेशी घरगुती वापराच्या तारेचा संपर्क आला. यामुळे या विभागातील अनेक घरातील विद्युत वायरिंग व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली. या घटनेत महेश मंगलदास करमळकर (२५) व संजय रामभाऊ गरड (४०) हे दोघे कामगार भाजल्याने गंभीर जखमी झाले. त्यांचे जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.

या स्फोटामुळे जगन गहाणे, नंदकिशोर भागडे, बेबी गायकर यांच्या घरातील वायरिंग, वीज मीटर व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. याबाबत तपास सुरु आहे.