अशोका बिल्डकॉन आणि भुजबळ फाऊंडेशन यांच्यात झालेल्या कोटय़वधींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मंगळवारी सक्तवसुली संचालनालय, प्राप्तिकर विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त पथकाने शहरातील या कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला. सकाळपासून अशोका बिल्डकॉनचे कार्यालय ताब्यात घेऊन कागदपत्रांची सुरू असलेली छाननी सायंकाळी उशिरापर्यंत कायम होती.
सक्तवसुली संचालनालयाकडून छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी नाशिक येथे आलेल्या खासदार किरीट सोमय्या यांनी अशोका बिल्डकॉनच्या संचालकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. तपास यंत्रणांनी भुजबळांच्या महालाची १०० कोटी रुपये किंमत गृहीत धरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा सांभाळत असताना भुजबळांनी अशोका बिल्डकॉनला नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासह राज्यातील अनेक रस्त्यांची कामे मिळवून दिली होती. त्या मोबदल्यात या ठेकेदाराने भुजबळ फाऊंडेशनला कोटय़वधी रुपये दिले. त्यातील ४० कोटींच्या बँक खात्यातील दस्तावेज मिळाले आहेत.
भ्रष्टाचारातून मिळालेल्या पैशांवर भुजबळ महालाचे बांधकाम झाल्याकडे सोमय्या यांनी लक्ष वेधले होते. अशोका बिल्डकॉनचे अशोक कटारिया आणि आशीष कटारिया यांनी भुजबळ कुटुंबीयांना ‘फिफा’चे फुटबॉल सामने दाखविण्यासाठी खास विमानाने परदेशात नेले होते. या कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करून संबंधित संचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी विविध यंत्रणांकडे करण्यात आल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. तेव्हा अशोका बिल्डकॉनने मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत कंपनीने भुजबळ कुटुंबियांच्या बंगल्यासह कोणत्याही बांधकामात कंपनीचा सहयोग नाही वा त्यांना आर्थिक मदतही केली नसल्याचे म्हटले होते.

संचालकांच्या उपस्थितीबद्दल मौन
या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, तपास यंत्रणांनी मंगळवारी अशोका बिल्डकॉन मुख्यालयाचा ताबा घेऊन तपास सुरू केला. मुख्यालयाचे प्रवेशद्वारावर बंद करण्यात आले. दिवसभर ही चौकशी सुरू होती. यावेळी कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. अशोका बिल्डकॉनचे संचालक कार्यालयात होते की नाही याची स्पष्टता झाली नाही. तपास यंत्रणांनी याबद्दल मौन बाळगणे पसंत केले.