‘प्रभू रामचंद्र की जय’च्या जयघोषात राज्यासह देशभरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यात ठिकठिकाणी हा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. प्रभूरामचंद्रांचा पदस्पर्श लाभलेल्या नाशिक नगरीतदेखील रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

काळाराम मंदिरातील गाभाऱ्यात राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीला नवीन वस्त्रे व पारंपरिक अलंकार घालण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण गाभारा फुलांनी सजवण्यात आला आहे. रामचंद्रांच्या दर्शनासाठी देशभरातील नागरिकांनी याठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. काळाराम मंदिर देवस्थानतर्फे दरवर्षी गुढीपाडव्यापासून वासंतिक नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जाते. कामदा एकादशीच्या दिवशी रामरथ व गरुडरथाची मिरवणूक दरवर्षी काढण्यात येते. या रथोत्सवाची तयारी देखील वेगाने सुरु आहे. मंगेशबुवा पुजारी यांच्या हस्ते आज पहाटे काकड आरतीने रामनवमीस सुरुवात झाली. यावर्षीचे पूजेचे अधिकारी चंदन पूजाधिकारी यांच्या हस्ते मुख्य महान्यास पूजा करण्यात आली. दुपारी १२ वाजता पूजाविधी करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

शुक्रवारी (दि.७) एकादशीच्या दिवशी श्रीरामप्रभू रथयात्रा व भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यंदाचा रामरथ व गरुडरथ ओढण्याचा मान रास्ते आखाडा तालीम संघ व अहिल्याबाई व्यायामशाळेला मिळाला असून संस्थानचे कर्मचारी, पुरोहित व भक्त या जन्मोत्सवात सहभागी होणार आहे. काळाराम मंदिरासह पंचवटीतीलच गोराराम मंदिर याठिकाणी देखील रामनवमी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात येत आहे. तसेच शहरातील विविध भागात रामनवमी महोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे.

धनुष्यबाणाच्या सहाय्याने प्रभू श्रीरामांनी ज्या ठिकाणी पाच राक्षसांचा वध केला, त्याच ठिकाणी पाच वडांचे वृक्ष निर्माण झाले, अशी आख्यायिका आहे. या पाच वडांच्या वृक्षांवरून परिसराला पंचवटी हे नाव पडले. विशेष म्हणजे हे पाचही वृक्ष आजही याठिकाणी उभे आहेत. या वृक्षांजवळच सीता गुंफा व पर्णकुटी आहे. जिथे रावणाने साधूच्या वेशात येऊन सीतेचे अपहरण केले होते. ही ठिकाणे आजही या ठिकाणी अस्तित्वात आहेत.

सीता गुंफेपासून हाकेच्या अंतरावर १७९० साली पेशव्यांनी काळाराम मंदिर बांधले. रामाच्या स्मृतींचे जतन करण्यासाठी हे धर्मक्षेत्र तयार करण्यात आले. जगभरात ख्याती असलेल्या या मंदिराला देश विदेशातील पर्यटक वर्षभर भेट देतात. विशेषत: रामनवमीच्या काळात हा संपूर्ण परिसर भक्तीमय होऊन जातो. गुढीपाडव्यापासून आकर्षक रोषणाईने संपूर्ण काळाराम मंदिर सजवण्यात आले. विविधरंगी लाईट्सद्वारे हा परिसर उजळून निघाला आहे.