• एसटीची जागा महापालिकेला मिळण्याची शक्यता धूसर
  • शहर बससेवा पालिकेकडे वर्ग झाल्यास राज्य परिवहनच्या ११०० कर्मचाऱ्यांची बदली

तोटय़ात चालणारी शहर बस सेवा महापालिकेला हस्तांतर करण्यास राज्य परिवहन महामंडळ तयार आहे, मात्र बसगाडय़ांची देखभाल, दुरुस्ती आदी सुविधांसाठी अस्तित्वात असणाऱ्या जागा राज्य परिवहन स्वत:कडेच ठेवणार असल्याने महापालिकेसमोर जागेचा अडथळा निर्माण झाला आहे. बस सेवेसह महामंडळाची जागा मिळण्याची जी शक्यता वर्तविण्यात येत होती ती यामुळे धूसर झाली आहे. तर दुसरीकडे शहर बस सेवा महापालिकेत वर्ग झाल्यास राज्य परिवहनच्या चालक-वाहकांसह तब्बल ११०० कर्मचाऱ्यांची इतर आगारांमध्ये बदली होणार आहे.

तब्बल ४० वर्षांपासून लाखो शहरवासीयांचा शहरातील प्रवास सुखकर करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात २०० गाडय़ा आहेत. महामंडळ पूर्ण क्षमतेने जेव्हा शहर बस सेवा चालवीत होते, तेव्हा २०० गाडय़ांच्या माध्यमातून दररोज पाच हजार फेऱ्या केल्या जात होत्या. तोटा कमी करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून फेऱ्या कमी केल्या जात आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत दीड हजार फेऱ्या कमी होऊन त्या साडेतीन हजारांवर आल्या आहेत. यामुळे शहर बस सेवेसाठीच्या ६० गाडय़ा वापरात नाहीत. सध्या केवळ १४० गाडय़ांमार्फत प्रवासी वाहतूक सुरू आहे. पुढील काळात टप्प्याटप्प्याने त्यात आणखी कपात करण्याचे नियोजन आहे. बस सेवा हस्तांतरित झाल्यास वापरात असलेल्या गाडय़ांचा ग्रामीण भागासाठी वापर केला जाणार आहे. शहर बस सेवेसाठी प्रत्येक बसला दोन दरवाजे करण्यात आले होते. ग्रामीण भागात वापर करण्यासाठी त्यातील एक दरवाजा बंद करण्याचे नियोजन आहे.

२०१० मध्ये जेएनयूआरम अंतर्गत १०० गाडय़ा महामंडळाला मिळाल्या होत्या. त्यातील काही बस गाडय़ांची अवस्था अतिशय बिकट आहे. शासकीय धोरणानुसार काही गाडय़ा भंगारात काढाव्या लागू शकतील, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

हस्तांतरणाच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी याच वर्षांत महापालिकेने अद्ययावत बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. शहर बस सेवेसाठी प्रारंभी २०० गाडय़ा उपलब्ध करण्यासह अरुंद मार्गासाठी मध्यम आकाराच्या बसचा विचार करण्यात आला आहे. बस सेवा सुरू करण्यासाठी आगार, स्थानक, बसगाडय़ा ठेवण्यासाठीची व्यवस्था आदी पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहेत. सध्या अस्तित्वात असणारी ही संपूर्ण व्यवस्था एसटी महामंडळाच्या मालकीच्या जागेत आहे.

शहर बस सेवेसाठी निमाणी, नाशिक रोड ही मुख्य स्थानके मानली जातात. याव्यतिरिक्त सातपूर या ठिकाणी महामंडळाची जागा आहे. गाडय़ा सुरक्षितपणे उभ्या करणे, त्यांची दुरुस्ती, आदी कामे आडगाव नाक्यावरील डेपोत केली जातात. शहरात अतिशय मोक्याच्या ठिकाणी या सर्व जागा आहेत. महामंडळाने आपल्या गरजेनुसार सर्व सुविधांची व्यवस्था केलेली आहे.

शहर बस सेवा महापालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर या सर्व जागा स्वत:कडे ठेवण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन असल्यामुळे महापालिकेसमोरील जागेचा पेचप्रसंग उभा राहिला आहे.

शहर बस वाहतुकीसाठी सुमारे १७० थांबे अस्तित्वात असून त्या जागाच केवळ महापालिकेच्या आहेत. त्यावर एसटी महामंडळाचा हक्क नसल्याचे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

ग्रामीण भागांत महामंडळाची बस सेवा; कर्मचाऱ्यांची बदली

महामंडळाच्या शहर बस सेवेत चालक, वाहक, मॅकेनिक, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी असे एकूण ११०० जणांचे मनुष्यबळ आहे. बस सेवा हस्तांतरित करताना या सर्वाची जिल्ह्य़ात वेगवेगळ्या ठिकाणी बदली केली जाणार आहे. महामंडळाची जिल्ह्य़ात १३ आगारे आहेत. काही आगारांमध्ये चालक-वाहकांसह कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. संबंधितांच्या मागणीनुसार कर्मचाऱ्यांची उपलब्धता तेथे केली जाणार आहे. सेवेत वापरल्या जाणाऱ्या बसेस ग्रामीण भागात प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जातील. त्यासाठी या बसमध्ये आवश्यक ते बदल केले जाणार असल्याचे महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी सांगितले आहे.

प्रवाशांचा जीव टांगणीला

महापालिकेची नवीन बस सेवा सुरू होत नाही तोपर्यंत प्रवाशांचा जीव टांगणीला लागणार आहे. महामंडळाच्या गाडय़ा कमी झाल्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागतो. शैक्षणिक वर्ष संपुष्टात येत असल्याने विद्यार्थी वर्गाकडून बसचा वापर कमी झाला आहे; परंतु नवीन शैक्षणिक वर्षांत हा प्रश्न कायम राहिल्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार असल्याची प्रवाशांची प्रतिक्रिया आहे.