योजनेच्या अंतिम टप्प्यात निवड होण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली
‘स्मार्ट सिटी’ योजना
केंद्राच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेचा पहिला टप्पा पार केल्यानंतर अंतिम टप्प्यात नाशिकची निवड होण्यासाठी ठेवण्यात येणारे निकषांची पूर्तता करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली असून त्यासाठी विविध स्पर्धाच्या आयोजनासह नाशिककरांचा कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढावा यासाठी स्वत: पालिका आयुक्त विविध ठिकाणी व्याख्याने देत आहेत. अलीकडेच त्यांनी पंचवटीतील के. के. वाघ शिक्षण संस्थेत विद्यार्थी व प्राध्यापकांना तसेच वैराज कलादालनात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्टसचे नाशिक केंद्र, आर्किटेक्टस व इंजिनीअर्स असोसिएशन, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीअर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित चर्चासत्रात मार्गदर्शन केले. स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागार, वास्तुविशारद, अभियंता यांनी क्रियाशील सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.
स्मार्ट सिटी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रस्ताव सादर करावयाचा असून प्रस्ताव या महिनाअखेपर्यंत तयार करणे अपेक्षित आहे. या प्रस्तावात नाशिकसाठी उपयुक्त अशा ‘रेट्रोफिटिंग’ व ‘ग्रीनफील्ड’ अशा प्रकल्पांचा प्राथमिकतेने विचार केला जात आहे. यासंदर्भात आयुक्तांनी मार्गदर्शन व सादरीकरण उपस्थित वास्तुविशारद व अभियंत्यांसमोर केले. सल्लागार मंडळींचा सर्वसामान्यांशी सातत्याने संपर्क असल्याने तसेच त्यांना तांत्रिक बाबींची पाश्र्वभूमी अवगत असल्याने त्यांनी शहराच्या विकासासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येत प्रस्ताव तयार करण्यात मोलाचा वाटा उचलावा, अशी सूचना आयुक्तांनी केली.
प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व सर्वसमावेशक असेल अशी खात्रीही आयुक्तांनी दिली. प्रस्ताव सादर करण्यासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने शहरातील वास्तुविशारद व अभियंत्यांनी स्मार्ट सिटी प्रस्तावासंदर्भात नागरिकांचे प्रबोधन करून त्यांच्या भावना नेमक्या शब्दांत प्रशासनाकडे पोहचविण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचनाही आयुक्तांनी केली. याप्रसंगी वास्तुविशारद रोहन जाधव, अनुप मोहबन्सी, प्रफुल्ल कारखानीस यांनी विविध सूचना मांडल्या. चर्चासत्रास आयआयए नाशिकचे अध्यक्ष प्रदीप काळे उपस्थित होते.
के. के. वाघ शिक्षण संस्थेत ‘स्मार्ट सिटी नाशिक’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात आयुक्त गेडाम यांनी मार्गदर्शन केले. नाशिक शहर पहिल्या २० शहरांमध्ये येण्यासाठी एक नाशिककर म्हणून विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले. परिसरातील कोणकोणत्या बाबी प्रस्तावात अंतर्भूत करायच्या याची माहिती १८ नोव्हेंबपर्यंत पालिकेच्या संकेतस्थळावर देण्याची तसेच प्रतिसाद अर्जावर मत नोंदविण्याची सूचनाही त्यांनी केली. विद्यार्थ्यांसह इतरांच्या कल्पनांचा आम्ही निश्चितच विचार करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष काशिनाथ टर्ले, विश्वस्त डॉ. के. एन. नांदुरकर, समीर वाघ, डॉ. शिरीष साने आदींनी त्यांचे स्वागत केले.
नागरिकांचा सहभाग स्मार्ट सिटीच्या उपक्रमांमध्ये असणे गरजेचे आहे. रेट्रो फिटिंग, पुनर्विकास आणि ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट या तीन प्रमुख पर्यायांपैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. संपूर्ण शहरात स्मार्ट सिटीची संकल्पना न राबवता एक विभाग आधी विकसित करून नंतर इतर विभाग टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येतील, असे आयुक्तांनी नमूद केले. मनपाच्या मिळकतीतून मिळणारे उत्पन्न शहराची सध्याची पाणीपट्टी, घरपट्टीची स्थिती, एलबीटीद्वारे मिळणारे उत्पन्न याची सखोल माहितीही दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता विसपुते यांनी केले. या वेळी के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने स्मार्ट सिटीसाठी उपयुक्त अशा सूचनांची ध्वनिचित्र फीत संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी गेडाम यांना दिली.

नगररचना योजनेविषयी कार्यशाळा
स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत नगररचना योजनेविषयी नाशिककरांना माहिती देण्यासाठी १६ नोव्हेंबर रोजी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात दुपारी ३ वाजता कार्यशाळा घेण्यात येणार आहे.
शहरातील आतापर्यंत अविकसित राहिलेल्या भागात सुनियोजितपणे वसाहत उभारून ‘हरित क्षेत्र’ म्हणून त्या भागाचा विकास करता येईल काय, याविषयी पालिकेची चाचपणी सुरू आहे. या प्रकल्पाचा समावेश नगररचना योजनेत होणे आवश्यक असून त्यासाठी नाशिककरांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यासाठी नगररचना योजना म्हणजे नेमके काय, या योजनेत समाविष्ट असणाऱ्या गोष्टी, या योजनेचे फायदे, अशी सर्व माहिती नाशिककरांना मिळावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत नगररचनाचे उपसंचालक शिवराज पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेस महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापतीसह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यशाळेस सर्व नाशिककरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नगररचनाच्या साहाय्यक संचालकांनी केले आहे.