नाशिक : हंगामाच्या प्रारंभी ‘निसर्ग’ चक्री वादळाच्या तडाख्यात मुसळधार पाऊस अनुभवणाऱ्या नाशिकमध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत सलग काही दिवस संततधार झालेली नाही. अधुनमधून हजेरी लावून पाऊस गायब होत आहे. ढगाळ वातावरणामुळे तो कधीही बरसेल असे वाटते. परंतु, काही तासात ऊन पडते. काही दिवसांपासून उन-सावलीचा खेळ सुरू असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या हंगामात ५१५ मिलीमीटर अधिक म्हणजे पाच हजार ९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी एक जून ते नऊ जुलै या कालावधीत ४५८२ मिलीमीटर पाऊस झाला होता.

२४ तासात जिल्ह्य़ात १४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरी, पेठ, सुरगाणा हे तीन तालुके वगळता नाशिक, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, बागलाण, कळवण, सिन्नरमध्ये रिमझिम स्वरुपात पाऊस झाल्याचे दिसून येते. या हंगामात याची अनेकदा अनुभूती येत आहे. कधीतरी तो जोरदार हजेरी लावतो तर कधी अचानक गायब होतो. मागील काही वर्षांत पावसाने अनेकदा विलंबाने हजेरी लावली आहे. परिणामी टंचाईला तोंड द्यावे लागले. मागील वर्षी प्रचंड पाऊस झाल्यामुळे यंदा उन्हाळ्यात फारशी टंचाई जाणवली नाही. बहुतांश धरणांमध्ये उन्हाळ्यातही काहीअंशी पाणी होते. यामुळे टंचाईची तीव्रता जाणवली नसली तरी पावसाचा प्रवास नेहमीपेक्षा वेगळा असल्याचे चित्र आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक १०६१ मिलीमीटर पाऊस झाला. त्याखालोखात बागलाणचा क्रमांक असून या तालुक्यात ४४४ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.

चार तालुक्यांत अत्यल्प पाऊस

अनेक तालुक्यात आतापर्यंत २०० ते २५० मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला असला तरी दिंडोरी, नांदगाव, चांदवड आणि निफाड या चार तालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. या तालुक्यात आतापर्यंत केवळ १५० ते १७० मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये दिंडोरीत १५१, चांदवड १७०, देवळा १६६ आणि निफाड तालुक्यात १६६ मिलीमीटर पाऊस झाला. गेल्या वर्षी दिंडोरी तालुक्यात अधिक पाऊस होता. तर चांदवड, निफाड आणि देवळा तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस झाल्याची आकडेवारी आहे.