आज स्थायी समितीची बैठक

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना बुधवारी महाकवी कालिदास कला मंदिरात सर्वसाधारण सभा घेण्याची सत्ताधारी भाजपची धडपड अखेर व्यर्थ ठरली. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांनी टाळेबंदीतील नियमावली, गर्दी जमविण्यास प्रतिबंध आणि एकंदर परिस्थितीची जाणीव करून दिल्यानंतर ही सभा स्थगित करण्याचा निर्णय महापौर सतीश कुलकर्णी यांनी घेतला. सर्वसाधारण सभा होणार नसली तरी मंगळवारी स्थायी समितीची बैठक मात्र घेण्यात येणार आहे.

स्थायीच्या अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी नसल्याने कामे करताना अडचणी येतात. मार्च, एप्रिलमध्ये सभा झाली नाही. सलग दोन सभा न झाल्यास महापौर, उपमहापौर यांच्यावर कारवाई होऊ शकते. अशी कारणे देऊन भाजपने शारीरिक अंतराचे पालन व्हावे म्हणून मे महिन्यातील सभा थेट महाकवी कालिदास कला मंदिरात घेण्याचे नियोजन केले होते.

सभेच्या ठिकाणी १२६ नगरसेवक, विभागाचे प्रमुख अधिकारी, वाहनांचे चालक, कर्मचारी आदी उपस्थित राहून मोठी गर्दी होईल. सध्या सभा बोलाविणे ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा विरोधी पक्षाने दिला होता. शिवाय करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना सभा बोलाविल्यास त्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर राहणार असल्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती.

सभेसाठी महापौरांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. जिल्हा प्रशासनाने महापालिकेची सभा घ्यायची की नाही, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महापालिकेचा आहे. शासनाने सभा, बैठका घेण्यास मनाई केलेली आहे. त्याचा विचार करून पालिकेने योग्य तो निर्णय घ्यावा, असे पालिका आयुक्तांना सूचित केले होते. यावर महापौरांनी पालिका आयुक्तांकडे विचारणा केली. त्यांनी देखील टाळेबंदीतील नियमावली, शारीरिक अंतराचे निकष आदींचे संदर्भ देत सर्वसाधारण सभेबाबत महापौरांना अंतिम निर्णय घेण्यास सुचविले होते.

त्यानुसार महापौर सतीश कुलकर्णी यांनी सभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सभेच्या आयोजनावरून भाजपने एक पाऊल मागे घेतले असले तरी मंगळवारी स्थायीची बैठक मात्र होणार आहे. ही बैठक पालिकेतील सर्वसाधारण सभेच्या सभागृहात होईल. हे मोठे सभागृह आहे. स्थायीचे १६ सदस्य असतात. त्यामुळे त्या बैठकीत शारीरिक अंतराचा निकष पाळला जाईल, असे महापौरांनी सांगितले.

गोदावरी-नव्या पुलांसाठी धडपड

सर्वसाधारण सभा स्थगित झाली असली तरी स्थायी समितीची बैठक महापालिकेच्या सर्वसाधारण सभा होणाऱ्या पालिकेतील सभागृहात शारीरिक अंतराचे निकष पाळून होणार असल्याचे स्थायी सभापती गणेश गिते यांनी सांगितले. विषय पत्रिकेत मान्सूपूर्व कामांच्या जोडीला गोदावरी नदीवरील दोन नवे पूल बांधण्याचा विषयही समाविष्ट आहे. या पुलावरून मध्यंतरी भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले होते. एका गटाने नव्या पुलांचा आग्रह धरला. भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी त्यास विरोध केला. पुलामुळे पात्राचा संकोच होऊन काठावरील घरांना पुराचा धोका वाढेल, असे त्यांचे म्हणणे आहे. या पुलांचे विषय पत्रिकेत असल्याने या बैठकीसाठी भाजपने धडपड केल्याचे सांगितले जाते.