लेखा-वित्त अधिकाऱ्यासह सात जणांना नोटीस

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीने आपले सुमारे साडेचारशे कोटी रुपये येस बँकेतून राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात ठेवण्याची दक्षता घेतली असताना लेखा-वित्त विभागाच्या निष्काळजीपणामुळे महापालिकेचे ३११ कोटी रुपये अडकून पडले आहेत. त्यातील १७४ कोटी रुपये शासनाला द्यावयाची रक्कम आहे. पैसे अन्य बँकेत वर्ग करण्याबाबत पालिका आयुक्तांनी लेखी सूचना दिली होती. त्याकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्तांनी मुख्य लेखा-वित्त अधिकारी गुलाबराव गावित यांच्यासह सात जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधितांवर जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

येस बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने लादलेल्या र्निबधांची सामान्य ग्राहकांप्रमाणे महापालिका, शिक्षण मंडळ, स्मार्ट सिटीसारख्या कंपन्यांना कमी-अधिक प्रमाणात झळ बसली. महापालिकेचे येस बँकेत सुमारे ३११ कोटी, तर शिक्षण मंडळाचे १५ कोटी रुपये अडकले आहेत. स्मार्ट सिटी कंपनीची मोठी रक्कम अडकण्यापासून वाचली. येस बँकेतील सुमारे साडेचारशे कोटी रुपये बँकेने वर्षभरात अन्य बँकेत वर्ग केले. सध्या कंपनीचे १४ कोटी रुपये अडकले आहेत.

कर संकलनासाठी महापालिकेने ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवस्था केली आहे. त्याअंतर्गत येस बँकेशी करारही करण्यात आला. महापालिकेची येस बँकेत एकूण २४ खाती आहेत. यामध्ये ३११.६४ कोटी रुपये अडकून पडले. येस बँकेत मुख्यत्वे २०१५ ते २०१८ या कालावधीत खाती उघडली गेली. आपल्या कार्यकाळात ही खाती उघडली गेली नसल्याचे आयुक्त गमे यांनी नमूद केले. कोणत्या खात्यात किती रक्कम आहे, याची आकडेवारी त्यांनी सादर केली. यामध्ये अतिरिक्त चटई क्षेत्रापोटी संकलित झालेल्या १७४ कोटींचा समावेश आहे. ही रक्कम शासनाला द्यावयाची आहे. उर्वरित रक्कम कर संकलन तसेच तत्सम बाबींशी निगडित आहे. महापालिकेच्या मुख्य लेखा-वित्त अधिकारी आणि स्मार्ट सिटी कंपनीला येस बँकेतील रक्कम काढून घेण्याबाबत ऑक्टोबर २०१९ मध्ये सूचित करण्यात आले होते. बैठकीत याबाबत सूचना दिल्या गेल्या. महापालिकेच्या लेखा-वित्त अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची परिणती ही रक्कम अडकण्यात झाल्याचे दिसत

आहे.

येस बँकेत पैसे ठेवू नयेत अशी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी गुलाबराव गावित, उपलेखापाल हरीश परमार, कनिष्ठ लेखापाल दत्तात्रय पुंड, वैभव मोटकरी, राहुल पवार, कनिष्ठ लिपिक प्रवीण गुळवे, भारती गायकवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.