महापालिके चा निर्णय

नाशिक : शहरातील करोनाचा आलेख खाली येत असताना या विषाणूविरोधात लढणारी प्रतिपिंड किती जणांच्या शरिरात तयारी झाली आहेत, याचे अवलोकन करण्यासाठी पुढील दोन दिवसांत सिरो सर्वेक्षणास सुरुवात होत आहे. त्याअंतर्गत वेगवेगळ्या भागांतील अडीच हजार नागरिकांचे नमुने घेतले जाणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत सिरो सर्वेक्षणास सुरुवात होत असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी शहरात करोनाचा झालेला उद्रेक हळूहळू नियंत्रणात येत आहे. सध्या प्रतिदिन १५० ते २०० नवीन रुग्ण आढळतात. प्रारंभी दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. कालांतराने झोपडपट्टी क्षेत्रातून तो बंगले, इमारतींच्या कॉलनी परिसरात शिरला. या भागात त्याने बराच काळ मुक्काम ठोकला. सध्या रुग्णांचे प्रमाण बरेच कमी झाले असले तरी करोनाचे संकट टळलेले नाही.

मुंबई, पुण्यात नव्या विषाणूचे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. या भागातून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उद्योग व्यवसाय सुरळीत होऊन बाजारपेठा नेहमीप्रमाणे गजबजल्या. या काळात रुग्णांचे प्रमाण तुलनेत कमी झाल्याचे दिसले. कळत-नकळतपणे विषाणूचा संसर्ग होऊन काही रुग्ण नकळतपणे बरे झाल्याचाही अंदाज व्यक्त केला जातो. सिरो तपासणीमुळे विषाणूविरोधात लढण्यासाठी किती जणांमध्ये हर्ड इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्ती तयार झाली याची स्पष्टता होणार आहे. त्यावरून किती जणांना हा संसर्ग होऊन गेला असेल याचा अंदाज बांधता येईल.

सिरो सर्वेक्षणासाठी महापालिकेने एकूण ४० पथके तयारी केली आहेत. वेगवेगळ्या भागांत दर दहाव्या घरात हे सर्वेक्षण करून नमुने घेण्याचे निश्चित करण्यात आले. या सर्वेक्षणात वेगवेगळ्या भागांतील अडीच हजार नागरिकांचे नमुने संकलित केले जाणार असल्याचे डॉ. नागरगोजे यांनी सांगितले. शास्त्रीय पद्धतीने हे सर्वेक्षण होईल. १८ वर्षांपुढील व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेतले जातील. तत्पूर्वी संबंधिताचे संमतीपत्र घेतले जाईल. भ्रमणध्वनीवर सिरो सर्वेक्षणाचा अर्ज भरला जाणार आहे. प्रत्येक पथकात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा साहाय्यक, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश राहील. या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर, पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. करोनाकाळात वैद्यकीय विभागासह महापालिकेच्या पथकांनी उत्तम काम करून करोना नियंत्रणात ठेवल्याचे प्रशस्तीपत्रक आयुक्त कैलास जाधव यांनी दिले.

या सर्वेक्षणात किती जणांमध्ये करोनाविरोधात प्रतिकारशक्ती तयार झाली याचा अंदाज येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात यापूर्वी मालेगाव शहरात तेथील महापालिकेने सात हजार जणांची सिरो तपासणी केली होती.