18 November 2017

News Flash

नाशकात धारदार शस्त्राने सराईत गुन्हेगाराचा खून

ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नाशिक | Updated: May 19, 2017 10:56 AM

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला पंचवटी परिसरातील किरण निकम (वय २८, रा. नवनाथ नगर, पंचवटी) याचा खून करून मृतदेह नवनाथनगर येथील निर्जनस्थळी फेकून देण्यात आला.

नाशिकच्या पंचवटी परिसरातील एका सराईत गुन्हेगाराची हत्या करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १८) रात्री १० वाजेच्या सुमारास पेठरोड परिसरात घडली. धारदार शस्त्रांच्या सहाय्याने वार करून त्याचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे फुलेनगर परिसरात रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला पंचवटी परिसरातील किरण निकम (वय २८, रा. नवनाथ नगर, पंचवटी) याचा खून करून मृतदेह नवनाथनगर येथील निर्जनस्थळी फेकून देण्यात आला. किरण निकमच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यामध्ये खून, अपहरण, खंडणी, हाणामारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये तो निर्दोष सुटला होता. किरणचा खून हा पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्यासह पोलिसांचे पथक रात्री उशिरापर्यंत पंचवटी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून संशयितांचा शोध घेत होते. रात्री उशिरापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. शवविच्छेदनासाठी या युवकाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात रात्री उशिराने आणण्यात आला. याठिकाणी त्याचे संतप्त नातेवाईक आणि मित्रपरिवार जमा झाल्यामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे येथील परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आली. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

First Published on May 19, 2017 10:43 am

Web Title: nashik panchvati murder of criminal crime