नोटाबंदीनंतर तब्बल तीन ते चार महिन्यांनी नाशिक शहरासह जिल्हाभरातील एटीएम कार्यान्वित होत असतांना गेल्या एक-दीड महिन्यापासून पुन्हा सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांच्या एटीएममधील खडखडाटामुळे नाशिककर हैराण झाले होते. जिल्ह्यातील व शहरातील सर्वसामान्यांपासून नोकरदार वर्ग व व्यावसायिकांना याची आर्थिक झळ बसली. तर आता जगभर खळबळ उडवून देणार्‍या ‘वॉनाक्राय’ या ‘रॅन्समवेअर’ व्हायरसच्या धास्तीने जिल्ह्यातील बहुतांश एटीम सोमवारपासून बंद पडल्याने नाशिककर पुन्हा एकदा कॅशलेस झाले आहेत.

भारतासह जगभरातील १०० देशांत ‘वॉनाक्राय’ या ‘रॅन्समवेअर’ प्रकारच्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. जगभरातील सुमारे ७५ हजार संगणकावर या व्हायरसच्या माध्यमातून सायबर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे इंग्लडमधील रुग्णालये व दुरध्वनी यंत्रणा देखील बंद पडली होती. या प्रकारामुळे अनेक रुग्णालयाची रुग्णांची शस्त्रक्रियाही रद्द करावी लागली होती. जगातील १०० देशांतील संगणक व्यवस्था व यंत्रणांना प्रभावीत करून खळबळ उडवून देणाऱ्आ या व्हायरसचा धसका घेत नाशिक शहरातील राष्ट्रीयकृत बँकांसह बहुतांश खाजगी बँकांनी एटीएम सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिकची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा कोलमडली आहे. नोव्हेंबर महिन्यातील नोटाबंदीनंतर संपूर्ण जिल्ह्यात २४ तास नियमित सुरू राहणारे एटीएम आता शोधूनही सापडत नाही. एटीएम नियमित सुरू ठेवण्याबाबत बँकांनी दाखवलेल्या एकूणच उदासीनतेमुळे नाशिककरांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आह़े.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत देशवासीया नेट बँकिंग व डिजिटल बँकिंगकडे वळले. मात्र, ‘वॉनाक्राय’ या ‘रॅन्समवेअर’ व्हायरसच्या भीतीने कालपासून सलग दोन दिवस अत्यल्प प्रमाणात ऑनलाइन व्यवहार झाल्याचे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

[jwplayer 6emyBwaS]