आठ दुचाकी आणि दहा सिलिंडर हस्तगत
शहरात चोरी व लुटमारीचे प्रकार वाढत असताना पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत वाहन आणि गॅस सिलिंडर चोरीचा छडा लावण्यात यश मिळविले. चोरटय़ांकडून आठ दुचाकी तर दहा सिलिंडर हस्तगत करण्यात आले आहेत.
शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटना पोलिसांसह नागरिकांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत. त्यामागे एखादी टोळी सक्रिय असल्याची शंका व्यक्त होत असतांना पोलीस यंत्रणेला एका संशयिताची माहिती समजली. चोरीची गाडी घेऊन संशयित द्वारका परिसरातील हॉटेल मथुरा येथे येणार असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचण्यात आला. संशयित काळ्या रंगाची हिरो होंडा सिडी डॉन या दुचाकीवर हॉटेल परिसरात आला. पोलिसांनी विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वाहन चोरीची कबुली दिली. या संशयिताकडून तीन हिरोहोंडा स्प्लेंडर, दोन अॅक्टीव्हा व एक हिरो होंडा सीडी डॉन, सुझुकी जिक्सर, बजाज डिस्कव्हर अशी एकूण आठ दुकाची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्यांची किंमत अंदाजे दोन लाख ४५ हजार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका परिसरातील गॅस वितरकाच्या गोदामातील सिलिंडर चोरीचा छडा लावण्यात यंत्रणेला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करताना पोलिसांना चोरीस गेलेले सिलिंडर हे क्रांतीनगर परिसरातील झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी घरात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली.
या आधारे गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी क्रांतीनगर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या बाळु किसन खानझोडे, रमेश उमेश हांडवे, शाम विठ्ठल मिरखे यांच्या घरी छापा टाकला. त्यांच्याकडून चोरीस गेलेले १० गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. या
गॅस सिलिंडरची किंमत २० हजार रुपये आहे.