‘रिक्षा सारथी-आदर्श रिक्षाचालक नाशिकची ओळख’ उपक्रम

नाशिक : शहरातील रिक्षाचालकांविषयीची नकारात्मक प्रतिमा बदलून त्यांचा इतरांसाठी आदर्श निर्माण व्हावा यासाठी आता पोलिसांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी मंगळवारी ‘रिक्षा सारथी-आदर्श रिक्षाचालक नाशिकची ओळख’ या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. या उपक्रमात प्रामाणिकतेला साथ आणि अप्रामाणिकतेवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या उपक्रमास नाशिक शहर पोलीस आणि संक्रमण या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यातून रविवार कारंजा येथून सुरुवात करण्यात आली. लवकरच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने पोलीस हा उपक्रम संपूर्ण शहरात राबविणार आहेत. या उपक्रमातंर्गत रविवार कारंजा रिक्षा थांबा येथील ४० चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ज्या रिक्षा चालकांच्यां वाहनाची कागदपत्रे नियमानुसार आहेत, त्यांची वर्तणूक चांगली आहे, अशा १४ रिक्षा चालकांना माहिती फलकाचे वाटप करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त माधुरी कांगणे, वाहतूक विभागाचे डॉ. अजय देवरे आदी यावेळी उपस्थित होते.  सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रिक्षाचालकांची भूमिका महत्त्वाची आहे. अनेक रिक्षाचालक प्रामाणिकपणे सेवाभावी वृत्तीने काम करीत असतात. या व्यवसायात काही वाईट प्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी चांगल्या रिक्षा चालकांना समाजासमोर आणून नकारात्मक भावना बदलण्यासाठी रिक्षा सारथी- आदर्श रिक्षाचालक नाशिकची ओळख या उपक्रमाची संकल्पना मांडल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सिंगल यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या रिक्षा चालकांचे कौतुक केले. अशा रिक्षा चालकांच्या प्रगतीसाठी पोलीस दल सतत पाठीशी राहील. पोलिसांकडून अनेकदा नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई होते. त्यांनी देखील नियमांचे पालन करावे आणि वर्तणुकीत बदल करावा; अन्यथा बेशिस्त रिक्षा चालकांवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

 

माहिती फलकाद्वारे सुरक्षिततेची भावना

उपक्रमातंर्गत पोलीस, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रिक्षा चालकांसह त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे आणि रिक्षाचालकांचे राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. चालकांचे कुटुंबीय, पाल्य यांना शैक्षणिक, व्यावसायिक मदत करणे या उपक्रमाचा भाग आहे. वाहनाची सर्व कागदपत्रे नियमानुसार ठेवणारे आणि प्रवाशांशी सौजन्यपूर्वक वर्तन ठेवणाऱ्या चालकांना पोलीस माहिती फलक देणार आहेत. हा फलक रिक्षात मागील बाजूला प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने लावण्यात येईल. त्या फलकात रिक्षा चालक, परमिटधारकाचे छायाचित्र, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, परमिट क्रमांक, चालक परवाना क्रमांक आदी नमूद असतील. जेणेकरून प्रवाशांना अशा रिक्षांमध्ये प्रवास करताना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.