विमान सेवा अखंडित ठेवण्यासाठी प्रवासी देण्याची हमी

हवाई नकाशावरील नाशिकचे स्थान नव्याने पुनस्र्थापित करताना ते कायमस्वरूपी अबाधित राखण्याचा संकल्प पुन्हा एकदा सर्व घटकांनी एकत्रित येऊन केला आहे. त्यानुसार उडाण योजनेंतर्गत जेट एअरवेज् १५ जूनपासून दिल्ली-नाशिक आणि नाशिक-दिल्ली अशी आठवडय़ातून तीन दिवस विमान सेवा सुरू करत आहे. ही सेवा सुरू झाल्यावर नाशिकहून दोन तासांत दिल्लीला पोहोचता येणार आहे. स्थानिक उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी संघटनांनी या सेवेसाठी नियमित काही प्रवाशांची नोंदणी करण्याची तयारी दर्शविली. उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना या सेवेकडे आकर्षित करण्यात येणार आहे.

उडाण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे ही एअर डेक्कनने सुरू केलेली विमान सेवा बारगळली. मागील काही वर्षांपासून हवाई नकाशावर नाशिकचे स्थान डळमळीत राहिल्याचा इतिहास आहे. नव्याने सुरू होणारी दिल्ली-नाशिक, नाशिक-दिल्ली विमान सेवा अविरतपणे कार्यान्वित राहावी या उद्देशाने ‘निमा’च्या पुढाकारातून गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खा. हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, जेट एअरवेजचे अधिकारी उपस्थित होते.

या सेवेद्वारे दिल्लीहून नाशिक आणि नाशिकहून दिल्ली केवळ दोन तासांत गाठता येईल. प्रवाशांनी केवळ दिल्लीचा विचार न करता देशात, परदेशात कुठेही जाण्यासाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याकडे ऋचिता सिंग यांनी लक्ष वेधले. नाशिकहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या वेळेत दिल्लीहून देशासह परदेशात कुठे कुठे संलग्न विमान सेवा उपलब्ध होईल याची माहिती या वेळी देण्यात आली. कंपनीला ही सेवा अखंडितपणे चालवायची आहे. स्थानिकांनी प्रत्येक फेरीसाठी काही विशिष्ट तिकीट नोंदणीची शाश्वती द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या विमान सेवेद्वारे काही प्रमाणात माल वाहतुकीची व्यवस्था केली जाणार आहे. तिचा स्थानिक उद्योजक, शेतकरी आदी घटकांना लाभ होऊ शकतो.

खा. हेमंत गोडसे यांनी महत्प्रयासाने सुरू होणाऱ्या सेवेत लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. विमान कंपनी आणि उद्योजक संघटनेने सर्वेक्षण केलेले आहे. रेल्वे प्रवासाचे तिकीट दर आणि विमान सेवेचे दर जवळपास समान आहेत. विमान प्रवास किफायतशीर असून उत्तम प्रतिसाद दिल्यास ही सेवा अखंडितपणे सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी जिंदालसारख्या एका उद्योगाकडून महिन्याकाठी ६० विमान प्रवासाची तिकिटे नोंदणी होत असल्याचे सांगितले. जिल्ह्य़ात असे अनेक मोठे उद्योग आहेत. त्यासह व्यावसायिक, शैक्षणिक, विधि अशा विविध क्षेत्रांतील मंडळी कामानिमित्त दिल्ली येथे ये-जा करतात. या सेवेला पाठबळ देण्याकरिता निमा उत्तर महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळेल, याकरिता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सूचित केले. दिल्लीहून येणाऱ्या आणि नाशिकहून ओझर विमानतळावर जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी ३५० रुपयांत टॅक्सी सेवेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ‘तान’चे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी दिली. या विमान सेवेमुळे ओझर विमानतळावर प्रवाशांची वर्दळ वाढणार आहे. त्यांच्या सुविधेसाठी विमानतळावर छोटेखानी उपाहारगृहाची गरज मांडण्यात आली

१६० तिकिटांची आगाऊ नोंदणी

नाशिक-दिल्ली विमान सेवेसाठी बोइंग प्रकारातील विमान वापरण्यात येणार आहे. त्यात १२ आसने विशेष श्रेणीतील, तर १५६ आसने ही सर्वसाधारण श्रेणीतील असतील. आठवडय़ातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी दिल्लीहून नाशिकला १२ वाजता झेपावणारे विमान दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ओझर विमानतळावर उतरेल. नंतर हेच विमान दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीसाठी रवाना होईल. दिल्ली विमानतळावर ते चार वाजून २५ मिनिटांनी उतरेल. म्हणजे, नाशिकहून दोन तासांत थेट दिल्ली गाठण्याची संधी उपलब्ध होईल. ही सेवा सुरू होण्याआधीच पुढील दीड महिन्याची १६० तिकिटांची तानकडे नोंदणी झाली आहे.

दर किफायतशीर ठेवण्याची मागणी

उडाण योजनेंतर्गत प्रत्येक फेरीत ४० तिकिटे सवलतीच्या दरात मिळणार आहेत. उर्वरित  तकिटांचे दर अधिक राहण्याची शक्यता आहे. ही विमान सेवा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी प्रत्येक फेरीत उडाणची ४० तिकिटे वगळता उर्वरित १०० तिकिटांचे दर साडेतीन ते साडेचार हजार  रुपयांच्या दरम्यान ठेवण्याची मागणी निमाचे अध्यक्ष पाटणकर यांनी केली. प्रवाशांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी त्याची गरज असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.