आरोग्य विद्यापीठातील कार्यशाळेत तज्ज्ञांचा सूर

नाशिक : करोनाची झळ जगभरात बसत आहे. आरोग्य सुरक्षित असेल तर समाज सुरक्षित राहील. करोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी व्यापक लसीकरणाची गरज आहे, असा सूर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने करोना प्रतिबंधक लसीकरण विषयावर आयोजित ऑनलाइन कार्यशाळेत उमटला. या कार्यशाळेत वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला.

करोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी नियमांच्या त्रिसूत्रीचा वापर अनिवार्य आहे. करोना प्रतिबंधक लस प्रभावी असून ती प्रत्येकाने घ्यावी, यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे संचालक डॉ. अश्विनीकुमार तूपकरी यांनी आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांनी सामाजिक आत्मभान जागृत ठेऊन काम करण्याची गरज अधोरेखित केली. करोनाविरुद्धच्या लढ्यात समाजात सकारात्मक विचार पसरवावेत. याकरिता स्वयंसेवकांचा गट तयार करून स्थानिक स्तरावर जनजागृतीचे कार्य करावे असे ते म्हणाले. करोना प्रतिबंधासाठी लसीकरण ही अत्यंत महत्त्वपूर्ण मोहीम आहे. समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे असून त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले.

ओरिजिन फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप माने यांनी शरीर सुदृढ असेल तर मन स्थिर आणि संयमी असेल तर आपण कोणत्याही रोगावर मात करू शकतो याकडे लक्ष वेधले. करोना आजारावर मात करण्यासाठी सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे. सकस आहाराचे सेवन, प्राणायाम, योगसाधना आणि सकारात्मक विचारांनी आयुष्य नक्कीच वाढणार आहे. संकटाच्या काळात न घाबरता शांतपणे त्याचा प्रतिकार करण्याचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. प्रारंभी, प्रास्ताविकात आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला व्यापक स्वरूप देण्याची गरज मांडली. यासाठी समाजात सकारात्मक विचारांचे आदान- प्रदान होणे गरजेचे आहे. करोनाकाळात आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती, डॉक्टर, विद्यार्थी आणि समाजसेवकांचे काम उल्लेखनीय आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रत्येकाने लसीकरण करणे गरजेचे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. कार्यशाळेचे समन्वयन आणि सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांनी केले.