15 December 2017

News Flash

ग्रामीण भागांत चार दिवसांत एक हजार वीज जोडण्या

विभागातील सर्व ग्राहकांना वीज जोडणी देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविली जात आहे.

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: August 5, 2017 1:24 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

महावितरणने ग्रामीण भागात सध्या नवीन वीज जोडणी देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत चार दिवसांत एक हजारहून अधिक ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. विशेष म्हणजे, महावितरणचे अभियंते, कर्मचारी गावागावांत पोहोचून नवीन ग्राहकांना जागेवर वीज जोडणी देत आहेत. विभागातील सर्व ग्राहकांना वीज जोडणी देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविली जात आहे.

मुख्य अभियंता दीपक कुमठेकर आणि अधीक्षक अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे यांनी विभागातील सर्व ग्राहकांना वीज जोडणी देण्याची मोहीम हाती घेतली आहे. विभागातील प्रत्येक गावात असलेली घरे व वीज जोडण्या त्यांच्यातील तफावत लक्षात घेऊन ही मोहीम आखण्यात आली. यातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार ज्यांच्याकडे वीज जोडणी नाही, अशा लोकांना वीज जोडणी देण्यासाठी अभियंते व कर्मचारी संबंधित गावांमध्ये जात आहेत.

वीज जोडणीसाठी आवश्यक मीटर, साहित्य सोबत घेऊन वीज अधिकारी-कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वीज जोडणी नसणाऱ्यांना बोलावून घेण्यात येते व वीज जोडणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येते. जागेवरच कोटेशन भरून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोटेशन भरून घेत जागेची व इतर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तातडीने वीज जोडणी देण्यात येत आहे.

१ ऑगस्टपासून ही मोहीम हाती घेण्यात आली असून चार दिवसांत १०४३ जणांना त्यांच्या गावी जाऊन जागेवर नवीन वीज जोडणी देण्यात आली. त्यात सिन्नर तालुक्यातील चास, चापडगाव, चोंडी, पाथरे, वावी, देवपूर, कानकोरी, नांदूर, मानोरी आदींसह परिसरातील गावांचा समावेश आहे. सिन्नर उपविभाग एकमध्ये ३५२ तर सिन्नर उपविभाग दोनमध्ये ६९१ जणांना या मोहिमेतून नवीन वीज जोडणी मिळाली.

पेठ, सुरगाणा, इगतपुरी आदी भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सुरगाणा येथे ११ ऑगस्ट रोजी यासाठी विशेष मेळावा घेण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन अधिकृतपणे वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

First Published on August 5, 2017 1:24 am

Web Title: new power connection in nashik rural areas