‘नॅब’चा मदतीचा हात; ‘ग्रॅफाइल्ड स्मार्ट’ यंत्राची सुविधा

दृष्टिहीन व्यक्तींना विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करताना शिक्षणाचा अडसर येतो. यावर मात करण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड (नॅब) महाराष्ट्र संस्थेने टाटा कन्सल्टिंग सव्‍‌र्हिसेसच्या साहाय्याने मदतीचा हात पुढे केला आहे. ‘सारा’च्या धर्तीवर इंग्रजी, मराठी, हिंदी माध्यमातून मुलांना अभ्यास करता येईल असे ‘ग्रॅफाइल्ड स्मार्ट’ यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातील काही तांत्रिक अडचणी दूर करून राज्यात नॅबच्या सर्व शाखांमध्ये हे यंत्र बसविण्याचा संस्थेचा मानस आहे.

नॅबला दृष्टिबाधितांच्या शिक्षणासाठी विशेषत: इंग्रजी विषयाकरिता ‘रीडर’ मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन शिक्षणाच्या वेळी अथवा स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या अडचणींसाठी अमेरिकेतून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून ‘सारा मशीन’ची (स्कॅनिंग ऑडिओ रीडिंग अ‍ॅप्लायन्स) व्यवस्था सर्व शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी नाशिक केंद्रात उपलब्ध करून देण्यात आली. नाशिक केंद्रातून या यंत्राचा लाभ पदवी, पदव्युत्तरसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारहून अधिक विद्यार्थी घेत आहेत. यातील बहुतेक विद्यार्थ्यांचा कल हा मराठी माध्यमाकडे आहे. सारा यंत्र केवळ इंग्रजी लेखन साहित्याशी संबंधित काम करते. रीडर म्हणून मराठी यंत्र उपलब्ध होण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू असताना टाटा कन्सल्टिंग सव्‍‌र्हिसेस फाऊंडेशन अंधाच्या शिक्षणावर काम करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संस्थेच्या मदतीने अहमदाबाद येथील ट्रेसल लॅबर्स कंपनीचे काही विद्यार्थी अंधांना शिक्षण देणाऱ्या संस्था, प्रत्यक्षात अंध विद्यार्थी यांच्या जीवनात येणाऱ्या शिक्षणविषयक अडचणी जाणून काही तोडगा काढता येईल का, याचा अभ्यास करत होते. बी. टेक संगणकशास्त्रातील अभिषेक वघेळ, बॉनी दवे, भानुप्रसाद यांच्या चमूने नॅबच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या विविध कल्पनांची माहिती दिली. या चर्चेत साराला पर्याय म्हणून कमी पैशांत, पण अंध व्यक्तींना उपयुक्त ठरेल असे काही देता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. वर्षभराच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रेसलच्या मदतीने साराला पर्याय म्हणून ‘ग्रॅफाइल्ड स्मार्ट’ हे यंत्र तयार करण्यात आले आहे.

यंत्रनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञ, विद्यार्थी, नॅबचे पदाधिकारी, अंध व्यक्ती यांनी त्यातील त्रुटींवर चर्चा करत त्यात बदल घडविले. अंध व्यक्तींच्या संस्थेत जाऊन या यंत्राचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवत त्यांच्याकडून त्यातील उणिवांचाही अभ्यास करण्यात आला. या यंत्रावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेचे वाचन करता येणार आहे. या यंत्रामुळे एकाच वेळी १० विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. मुक्त विद्यापीठात कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या सहकार्याने यंत्राची चाचणी घेण्यात आली.  हे यंत्र मुक्त विद्यापीठाने नॅब महाराष्ट्र संस्थेला दिले असून अंध विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीला वेग येईल आणि विद्यार्थी स्वत: अभ्यास करू शकतील, असा विश्वास नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी व्यक्त केला.

ग्रॅफाइल्ड स्मार्ट’ ‘सारापेक्षा स्वस्त

‘सारा’ला पर्याय म्हणून तयार झालेले ‘ग्रॅफाइल्ड स्मार्ट’ यंत्र ‘सारा’च्या तुलनेत स्वस्त आहे. सारासाठी जवळपास दोन लाखांचा खर्च होत असताना ग्रॅफाइल्डला केवळ ५० हजार रुपयांचा खर्च येतो. सुरुवातीस हे काम प्रायोगिक तत्त्वावर होत आहे. याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर झाल्यास किंमत कमी होईल. नाशिकसह अन्य १८ ठिकाणी हे यंत्र बसविण्याचा नॅबचा मानस आहे.

मुक्तेश्वर मुनशेट्टीवार प्रकल्प समन्वयक, नॅब